लोखंडी सळईचा वार झेलून चोराला पकडलं; पालघरच्या तरुणीचं थरारक धाडस"

लोखंडी सळईचा वार झेलून चोराला पकडलं; पालघरच्या तरुणीचं थरारक धाडस"

पालघर : पालघर शहरातील आदर्श नगर परिसरात एका बावीस वर्षीय तरुणीने प्रचंड धाडस दाखवत घरफोडी करून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांपैकी एका चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. काजल चव्हाण असे या धाडसी तरुणीचे नाव असून, तिच्या वेळीच घेतलेल्या कृतीमुळे एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. मात्र दुसरा चोर सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाला आहे.

ही घटना मंगळवारी सायंकाळी वसंत विहार इमारतीत घडली. फुलांचा व्यवसाय करणारे हितेश चव्हाण व त्यांच्या पत्नी काजल (२२) हे सायंकाळी साडेपाच वाजता घराबाहेर गेले होते. त्यांच्या पाठोपाठ सासूबाई गीता चव्हाणदेखील दुकानात गेल्यामुळे संधीचा फायदा घेत दोन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.


पहिल्या मजल्यावरील इतर घरे बंद असल्याने चोरट्यांनी शेजारच्या घराला बाहेरून कडी लावून, कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी कपाटांमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम एका बॅगेत भरायला सुरुवात केली. दरम्यान साडेसात वाजता काजल घरी परतली. दरवाजा उघडा दिसल्याने तिला संशय आला. घरात प्रवेश करताच तिला घर अस्ताव्यस्त आढळले. यावेळी एका चोरट्याने तिला आवाज न करण्याची धमकी देऊन लोखंडी अवजाराने तिच्या हातावर मारला आणि पळून गेला.


मात्र दुसरा चोर घराच्या आतील खोलीतून बाहेर येताच काजलने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पायाला घट्ट पकडून ठेवताच तो तिला फरपटत लिफ्टपर्यंत घेऊन गेला. काजलने जोरदार आरडाओरड केल्याने शेजारी आणि तिचा पती धावून आले. सर्वांनी मिळून त्या चोराला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली.


पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पकडलेल्या चोराकडे काही रोख रक्कम आणि गीता चव्हाण यांचे काही दागिने सापडले आहेत. तर दुसरा चोर सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला आहे. दोघेही रिक्षामधून आले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


या घटनेत काजलच्या हाताला दुखापत झाली असून, तिच्या धाडसाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. “काजलने मोठे धाडस दाखवले, आम्हा सगळ्यांचा तिचा अभिमान वाटतो,” अशी प्रतिक्रिया गीता चव्हाण यांनी दिली.




Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक