आसनगाव जमीन घोटाळा उफाळला; तहसीलदारांवर दुजाभावाचा आरोप, दुय्यम निबंधकाच्या चौकशीची मागणी
आसनगाव जमीन घोटाळा उफाळला; तहसीलदारांवर दुजाभावाचा आरोप, दुय्यम निबंधकाच्या चौकशीची मागणी
डहाणू : डहाणू तालुक्यातील आसनगाव येथील शासकीय जमिनीच्या बेकायदेशीर साठेकरार प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घोटाळ्याने इतकी गंभीर वळण घेतली आहे की, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. त्यानंतर जिल्हा प्रशासन हरकत घेऊ लागले असतानाच, डहाणू दुय्यम निबंधक कार्यालयाने वर्ग २ च्या शासकीय जमिनीची परवानगीशिवाय नोंदणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मौजे आसनगाव (सर्वे नं. १७१ व १७२) येथील वर्ग २ जमिनीवर बेकायदेशीर साठेकरार व कुळमुख्यतार केल्याप्रकरणी वाणगावचे अमित स्वामीनाथ चौबे यांना तहसीलदार सुनील कोळी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, याचप्रकारे मौजे आम्बिष्टेवाडी (सर्वे नं. १७/२२, दस्त क्र. डहण १७४/२०२४) आणि तणाशी (सर्वे नं. २१०/७, दस्त क्र. डहण १०८/२०२४) येथील जमिनींवर अमित भालचंद्र चुरी यांनी साठेकरार केल्याचे समोर आले असून, या प्रकरणात कोणतीही चौकशी न करता संबंधितांना मोकळीक दिल्याचा आरोप तहसीलदारांवर करण्यात आला आहे.
अमित चौबे यांनी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे तक्रार दाखल करत तहसीलदारांनी समान प्रकरणात दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे डहाणू दुय्यम निबंधक कार्यालय आणि काही दलाल संगनमताने जमिनीचे मुल्यांकन फुगवून खरेदी-विक्री व्यवहार केल्याचेही समोर येत आहे.
वाढवण बंदरामुळे डहाणू तालुक्यातील भूखंडांच्या किमती झपाट्याने वाढल्या असून, याच संधीचा गैरफायदा घेऊन बोगस दस्त नोंदणी, परवानगीशिवाय साठेकरार व जमिनींचे चुकीचे मुल्यांकन करून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले असल्याचा संशय आहे. त्यामुळे डहाणू दुय्यम निबंधक कार्यालयाची सखोल व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अमित चौबे यांनी केली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment