दिव्यराज बिल्डरकडून गायरान जमिनीवर अतिक्रमण; महसूल व ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दिव्यराज बिल्डरकडून गायरान जमिनीवर अतिक्रमण; महसूल व ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पालघर : तालुक्यातील पाम ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय भूखंडावर विकासकांनी अनधिकृतरित्या डांबरी रस्ता तयार केल्याचा आरोप माजी उपसरपंच अशोक वडे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी तहसीलदार पालघर, जिल्हाधिकारी पालघर आणि पाम ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली आहे.
यापूर्वीही विकासक दिव्यराज प्रॉपर्टीजचे भागीदार विरेंद्र शर्मा व जितेंद्र करानी यांनी या भूखंडावर आरसीसी कमान उभारली होती. या प्रकरणी तहसीलदारांनी पुढील आदेश होईपर्यंत मनाई केली होती. मात्र, आदेश डावलून त्याच शासकीय जमिनीवर आता डांबरीकरण केल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
हरिश्चंद्र माणक्या वडे यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक १७१ व १८/४ या जमिनीवर दिव्यराज प्रॉपर्टीजने निवासी व वाणिज्य प्रकल्प उभारण्यासाठी खरेदी केली आहे. मात्र, त्या जमिनीकडे जाण्यासाठी तुळशिबाई रघुनाथ राऊत व इतर भागीदार यांना शेतीसाठी वाटप केलेल्या शासकीय गट क्रमांक १६०/११३ या गायरान जमिनीतून खाजगी इमारतीसाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.
मंडळ अधिकारी तारापूर यांनीही अहवालाद्वारे सदर रस्ता शासकीय गायरान जमिनीतून जात असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही या जागेवर विकासकांनी रस्ता तयार केल्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप अशोक वडे यांनी केला आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या पार्श्वभूमीवर महसूल व ग्रामपंचायत विभागाने कारवाई का केली नाही, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. आदेश असतानाही बांधकाम पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment