लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात पत्रकार हक्क व समाजहिताचा निर्धार
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात पत्रकार हक्क व समाजहिताचा निर्धार
मुंबई : पत्रकारांसोबत समाजातील अन्याय व समस्यांच्या निवारणासाठी व्यापक सभासद नोंदणी करून प्रभावी दबावगट निर्माण करण्याचा निर्धार लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने केला आहे, अशी माहिती महासंघाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी दिली. मुंबई येथे पार पडलेल्या महासंघाच्या कोकण व मुंबई विभागाच्या ५ व्या विचारमंथन मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी संघटनेचे राष्ट्रीय मार्गदर्शक पुष्पराज गावंडे, महाराष्ट्र संघटक अरविंदराव देशमुख, मुंबई प्रदेश संघटक व मंत्रालयीन समन्वयक रफिक मुलानी यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना राजकीय प्रवाहात उतरवण्यासाठी महासंघ सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे संजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी चेंबूर नाका शिवसेना उपप्रमुख व आरोग्य समन्वयक विकास भोसले यांनी संजय देशमुख यांच्या सक्षम नेतृत्वाचे विशेष गौरवोद्गार काढले. मेळाव्याची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या वंदनेने झाली, तसेच शहीद जवान, अत्याचारग्रस्त महिला, दिवंगत पत्रकार, शेतकरी आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
"लोकस्वातंत्र्य समाज रत्न गौरव" हा राज्यस्तरीय पुरस्कार आमदार सुनिल प्रभू यांना जाहिर करण्यात आला. तसेच संघटनेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अरविंदराव देशमुख, सौ. सुषमा ठाकूर, पंजाबराव देशमुख, जगदीश प्रसाद करोतिया, संतोष घरत, देवेंद्र मेश्राम यांचा विशेष सन्मान स्मृतीचिन्ह प्रदान करून करण्यात आला.
कार्यक्रमात नवीन व अद्ययावत आयकार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा संघटक संजय सोळंके, अंधेरी संघटक राजीव विश्वकर्मा, उमेश चौधरी, अनिता देशमुख, सौ. छाया मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन सौ. सुषमा ठाकूर यांनी केले.
Comments
Post a Comment