भिमनगर जि. प. शाळेच्या लोकार्पण सोहळ्यात अनियमितता ; मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी

भिमनगर जि. प. शाळेच्या लोकार्पण सोहळ्यात अनियमितता ; मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी


बोईसर – बोईसर भिमनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पण सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे आरोप होत असून, मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे.


लोकार्पण नियमबाह्य?

शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण ७ मार्च २०२५ रोजी पार पडले. मात्र, ही इमारत अद्याप पूर्ण न झाल्याचे तसेच अधिकृत प्रमाणपत्रही न मिळाल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


"कार्यक्रम पक्षपाती" – पंचायत समिती सदस्य अजय दिवे

पालघर पंचायत समिती सदस्य अजय दिवे यांनी सांगितले की, हा कार्यक्रम सर्वसमावेशक असायला हवा होता, मात्र एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या जाहिराती आणि बोर्ड लावण्यात आले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रणही देण्यात आले नाही. “हा प्रकार निषेधार्ह आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.


"भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे" – ग्रामपंचायत सदस्य उषा जाधव


ग्रामपंचायत सदस्य उषा चंद्रकांत जाधव यांनी देखील या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. “शाळेच्या जुन्या इमारतीतील साहित्य शासन नियमावलीनुसार लिलाव न करता गायब करण्यात आले. नवीन इमारतीच्या कामातही अनियमितता झाली आहे. त्यामुळे जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


"चौकशी करून कारवाई करू" – शिक्षण अधिकारी वाघ

याबाबत शिक्षण अधिकारी वाघ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "जर कोणत्याही प्रकारची नियमबाह्य प्रक्रिया झाली असेल, तर त्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईल."


स्थानिक पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक