पाम ग्रामपंचायतीच्या वादग्रस्त कारवाईने पुन्हा चर्चेला ऊत; प्रभारी सरपंच, सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल
पाम ग्रामपंचायतीच्या वादग्रस्त कारवाईने पुन्हा चर्चेला ऊत; प्रभारी सरपंच, सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल
पालघर : तालुक्यातील पाम ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील दोनशेहून अधिक कारखान्यांकडून लाखोंचा कर वसूल करणारी ही ग्रामपंचायत विकासकामांपेक्षा फौजदारी गुन्हे दाखल होण्यासाठी अधिक चर्चेत आहे.
ग्रामपंचायतीने मुंबईतील बोरीवली येथे राहणाऱ्या पाम गावातील ग्रामस्थ चिंतामण हिराजी पाटील यांच्या वडिलोपार्जित जमिनीवरील कुंपण बेकायदेशीररित्या हटवून २,२०,००० रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही याच वादग्रस्त मालमत्तेवर कारवाई करण्याच्या कारणावरून ग्रामपंचायतीवर गुन्हे दाखल झाले होते.
◾कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
सदर प्रकरणात कोकण विभागीय आयुक्तांनी तक्रारीच्या चौकशीअंती तात्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर
फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच विवादित जमिनीची अधिकृत मोजणी करूनच पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून प्रभारी सरपंच मनोज पिंपळे व सदस्यांनी कोणतेही अधिकृत आदेश न घेता बुलडोझर फिरवला.
या कारवाईत सीसीटीव्ही कॅमेरे व पाइप गायब झाल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे. परिणामी, सातपाटी पोलीस ठाण्यात IPC 2023 च्या कलम 329(3), 189(2), 191(2), 324(4), 324(5) अंतर्गत प्रभारी सरपंच मनोज पिंपळे, सदस्य रोहित पाटील, भारती राऊत, श्वेता पाटील, मनिष जाधव, भारती पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
◾गटविकास अधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा
गटविकास अधिकाऱ्यांनी 7 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले होते की, सदर जमीन कोणाची आहे, हे ठरवूनच कारवाई करावी. भूमी अभिलेख विभागाकडून अधिकृत मोजणी न करता कोणतीही कारवाई करणे बेकायदेशीर ठरेल, असे स्पष्ट निर्देश होते. मात्र, ग्रामपंचायतीने प्रशासनाला विश्वासात न घेता ही कारवाई केली.
◾ग्रामसेवक भागवत कांबळे यांची सावध भूमिका
यावेळी ग्रामसेवक भागवत कांबळे यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत मांडून बेकायदेशीर कारवाईत सहभागी होण्याचे टाळले. त्यामुळे पोलिस कारवाईतून ते स्वतःची सुटका करण्यात यशस्वी झाले.
◾तक्रारदार चिंतामण पाटील यांचा आरोप
तक्रारदार चिंतामण पाटील यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करताना राजकीय दबावामुळे कारवाईस विलंब होत असल्याचा आरोप केला. तसेच, गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याऐवजी त्यांच्या खासगी जमिनीवरच कारवाई केली गेली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
◾पोलिस तपास सुरू
सदर प्रकरणी चिंतामण पाटील यांनी 21 फेब्रुवारी 2025 रोजी सातपाटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 12 मार्च 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल गणेश डवला करत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांनी दिली.
Comments
Post a Comment