डहाणू महावितरणचा कनिष्ठ अभियंता दोन लाखांची लाच घेताना अटकेत!
डहाणू महावितरणचा कनिष्ठ अभियंता दोन लाखांची लाच घेताना अटकेत
डहाणू : महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना पकडल्याची गंभीर घटना डहाणू तालुक्यातील आशागड येथे घडली आहे. अतुल अशोक आव्हाड या कनिष्ठ अभियंत्याने एका वीज ग्राहकाकडून तीन लाखांची लाच मागितली होती, त्यातील दोन लाख रुपये स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली.
◾वीज चोरीप्रकरणी लाचेची मागणी
एका तबेल्यामध्ये आकडा टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी तक्रारदाराला सात लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई टाळण्यासाठी अभियंता आव्हाड याने तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब पालघर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे कळवल्यानंतर खात्रीशीर माहितीच्या आधारे पालघर पथकाने सापळा रचला आणि आव्हाड याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
◾महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका
यापूर्वीही महावितरणच्या पालघर विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. पालघरचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर यापूर्वीच लाच प्रकरणी कारवाई झाली असून, आता कनिष्ठ अभियंत्यालाही लाच घेताना अटक झाल्याने महावितरण विभाग लाचखोरीत गुरफटल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
◾लाचलुचपत विभागाची यशस्वी कारवाई
या कारवाईत पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहभाग घेतला. पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, तसेच पोलीस कर्मचारी नवनाथ भगत, योगेश धारणे, विलास भोळे, दीपक सुमडा, आकाश लोहरे आणि जितेंद्र गवळी यांनी ही कारवाई केली.
Comments
Post a Comment