कलश बार अँड रेस्टॉरंटच्या बेकायदेशीर चिमणीचा त्रास – प्रशासनाकडून दुर्लक्ष की संरक्षण?
कलश बार अँड रेस्टॉरंटच्या बेकायदेशीर चिमणीचा त्रास – प्रशासनाकडून दुर्लक्ष की संरक्षण?
बोईसर : ओस्तवाल एम्पायर येथील शिवम अपार्टमेंटमधील ‘कलश बार अँड रेस्टॉरंट’च्या बेकायदेशीर चिमणीने नागरिक हैराण झाले आहेत. या चिमणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा आणि कर्कश आवाजाचा त्रास विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बेकायदेशीर चिमणी – नागरिकांना त्रास, प्रशासन शांत!
कलश बारने दोन गाळे बेकायदेशीरपणे व्यापून मागील बाजूस असलेल्या रहिवासी सदनिकेची तोडफोड करून किचन तयार केले आहे आणि त्यासाठी मोठी चिमणी बसवली आहे. या चिमणीमधून सतत तेलाचा स्राव होत असून, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे सोसायटीतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
रहिवाशांनी वारंवार बार मालकाकडे तक्रार केली, मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, सोसायटी पदाधिकाऱ्यांचे बार मालकाशी संगनमत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे हे सर्व कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळही झोपेत?
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या चिमणीच्या आवाजाने नागरिकांना झोप येत नाही, तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केलेल्या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन फक्त पोलिसांत जा, असा सल्ला देत आहे.
रहिवाशांचा सवाल – कलश बारवर कारवाई कधी होणार?
कलश बारवर कोणाचा तरी वरदहस्त आहे का? प्रशासनच जबाबदारी टाळत आहे का? हे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. रहिवाशांचे आरोग्य आणि सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी आणि कलश बारच्या बेकायदेशीर चिमणीवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
Comments
Post a Comment