बोईसर पूर्व लोखंडी पाडा: शासकीय जमिनीवर परप्रांतीयांचे अतिक्रमण
बोईसर पूर्व लोखंडी पाडा: शासकीय जमिनीवर परप्रांतीयांचे अतिक्रमण
बोगस नोटरीद्वारे विक्रीचा प्रकार उघड
बोईसर : बोईसर पूर्व लोखंडी पाडा येथे शासकीय जमिनीवर परप्रांतीयांनी अवैध बांधकामे करून बोगस नोटरीच्या मदतीने विक्री व्यवहार करण्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाच्या ताब्यात असलेल्या या जमिनीवर भूमाफियांनी ताबा मिळवून मोठ्या प्रमाणावर आरसीसी पद्धतीने व्यावसायिक गाळे व रहिवासी चाळी उभारण्याचा डाव आखल्याचे उघड झाले आहे.
◾शासकीय जमीन परप्रांतीयांच्या घशात
तुळशी चंद्र्या सुतार आणि इतर खातेदारांना गट क्र. २७/१ ते ६५/४६ (एकूण क्षेत्र १.६२.०० हेक्टर) ही जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ व ३६ अ अंतर्गत शेती प्रयोजनार्थ वाटप करण्यात आली होती. मात्र, या आदिवासी खातेदारांनी नियमभंग करून सदर जमीन परप्रांतीय नागरिकांना विकली.
शर्तीचे उल्लंघन झाल्याने ही जमीन शासनाने पुन्हा ताब्यात घेतली होती. मात्र, शासनाने सदर जमिनीला कुंपण न घालता मोकळी सोडल्याने काही भूमाफियांनी ही संधी साधत जमीन विक्रीचा काळाबाजार सुरू केला.
◾भूमाफियांचा अवैध व्यवहार आणि मोठ्या प्रमाणावर बांधकाम
नालासोपारा येथे राहणाऱ्या पारस कुशवाह आणि सरोज गुप्ता या महिलांना ही जमीन भूमाफियांनी विक्री केली असून, त्यांनी या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर आरसीसी पद्धतीने बांधकाम सुरू केले आहे. व्यावसायिक गाळे आणि रहिवासी चाळी बांधून मोठा नफा मिळवण्याचा त्यांचा डाव आहे.
◾ग्रामपंचायत सदस्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप
या जमिनीवरील अवैध बांधकामांसाठी बोईसर ग्रामपंचायतीच्या एका सदस्याच्या कुटुंबाकडून बांधकाम साहित्य पुरवले जात असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
◾शासनाकडून कारवाईची मागणी
ही जमीन आदिवासी शेतीसाठी वाटप करण्यात आलेली असल्याने तिचा वापर अन्य हेतूंसाठी होऊ नये, असे नियम असतानाही परप्रांतीयांनी अनधिकृत बांधकाम करून मोठा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अवैध बांधकामे त्वरित पाडावी आणि भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून सदर जमिनींवर संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment