बोईसर चित्रालयजवळ फेरिवाल्यांचे अतिक्रमण; वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न
बोईसर चित्रालयजवळ फेरिवाल्यांचे अतिक्रमण; वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न
बोईसर: बोईसर-तारापूर मुख्य रस्त्यावर चित्रालय परिसरात फेरिवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले असून, त्यामुळे येथे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी हा मार्ग अत्यंत गजबजलेला असतो, आणि याच वेळी रस्त्यावर फेरिवाल्यांचे बस्तान मांडले जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
अणुऊर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या परिसरात मोठ्या प्रमाणावर वसाहती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, या वसाहतींच्या प्रवेशद्वारासमोरच फेरिवाल्यांनी आपल्या वस्तू मांडल्यामुळे प्रवाशांना व वाहनचालकांना नाहक खोळंबा सहन करावा लागत आहे. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे वेळेवर पोहोचण्याच्या दडपणाखाली असलेल्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.
स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, अतिक्रमण हटवण्यासाठी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्यामुळे या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.
Comments
Post a Comment