पालघरमध्ये अंमली पदार्थविक्री करणाऱ्या महिलेस अटक ; ३ किलोहून अधिक गांजा जप्त
पालघरमध्ये अंमली पदार्थविक्री करणाऱ्या महिलेस अटक ; ३ किलोहून अधिक गांजा जप्त
पालघर : पालघर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून ३ किलो १४० ग्रॅम वजनाचा, सुमारे ३२,००० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
पालघर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अनंत पराड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गांधीनगर, पालघर येथे एका महिलेने गांजाची विक्री सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अनंत पराड आणि पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे यांनी प्राथमिक शहानिशा करून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या परवानगीने गांधीनगर येथे छापा टाकला. छाप्यादरम्यान, रेहाना हाजी मस्तान शेख (रा. गांधीनगर, पालघर पूर्व) हिला गांजा विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. तिच्या घरातून ३ किलो १४० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. ७०/२०२५ नोंदवण्यात आला असून, तिच्यावर एन.डी.पी.एस. कायदा १९८८ चे कलम ८ (क), २० (ब), ए (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत पराड, पोउपनि संकेत पगडे, पोउपनि दौलत आतकारी, सहा. पोउपनि सुभाष खंडागळे, पो हवा भगवान आव्हाड, पोहवा चंद्रकांत सुरूम, पोना परमेश्वर मुसळे, पोअ म्हाळू शिंदे, पोअ सागर राऊत, पोअं आकाश आराख, पोअं नितीन डोके, पोअं भगवान केंद्रे, मपोअं निर्मला वरपे आणि मपोअं पुनम खडके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पालघर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देत असामाजिक तत्वांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली असून, जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीस आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे संकेत दिले आहेत.
Comments
Post a Comment