वारांगडे फर्निचर मार्केटला भीषण आग; सात दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान
वारांगडे फर्निचर मार्केटला भीषण आग; सात दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान
बोईसर: बोईसर-चिल्हार रस्त्यावरील वारांगडे येथील फर्निचर मार्केटमध्ये आज पहाटे भीषण आग लागून सात दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, संपूर्ण परिसर धुराच्या लोटाने भरून गेला. आग नेमकी कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, फर्निचर दुकाने एकमेकांना लागून असल्यामुळे आगीचा वेग झपाट्याने वाढला. विशेष म्हणजे, या मार्केटमध्ये कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना नव्हत्या, त्यामुळे बचाव कार्यात अडथळे आले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, दुकाने दाटीवाटीने असल्याने पाणी मारण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून, आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
यापूर्वीही वाघोबा खिंड व गुंदले येथे शॉर्टसर्किटमुळे मोठ्या प्रमाणावर दुकाने जळून खाक झाली होती, मात्र त्यातून कोणताही धडा घेतला गेला नाही. नागरिकांनी वारंवार सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी केली असली तरी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
"दुकानांची दाटीवाटी, सुरक्षेची यंत्रणा नसणे, आग विझवण्याची साधने अपुरी असणे यामुळे वारंवार अशा घटना घडत आहेत. आता तरी प्रशासन जाग येईल का?" असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
Comments
Post a Comment