शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
कमारे धरणग्रस्त आणि सात गावांच्या वनपट्ट्यांचा प्रश्न मार्गी
केळवा देवीचा पाडा – ६८ कुटुंबांच्या जमिनीच्या समस्येवर लवकरच तोडगा
पालघर : पालघर तालुक्यातील कमारे धरणग्रस्त शेतकरी, सात गावांतील वनजमिनी अपील दावे आणि केळवा देवीचा पाडा येथील ६८ कुटुंबांच्या जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. प्रशासनासोबत झालेल्या सखोल चर्चेनंतर या तिन्ही प्रकरणांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून, लवकरच त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.
◾कमारे धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार
२०१७ पासून सुरू असलेल्या कमारे धरण प्रकल्पामुळे २९ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, मात्र शासनाच्या धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. हा मुद्दा प्रशासनासमोर मांडल्यानंतर २२.७३ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली असून, लवकरच त्यांना जमिनी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेस गती दिली जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी स्पष्ट केले.
◾सात गावांतील वनपट्टे मंजुरीच्या प्रक्रियेत
शेगाव, शेलवली, पडघे, मान, महागाव, सोनावेत, खडकोली, विश्रामपूर आणि दहिवले या गावांमधील वनजमिनी अपील दावे जिल्हास्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. अद्याप वनपट्ट्यांचे वाटप झाले नसल्याने हा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. प्रशासनाने सात दिवसांत ३०० हून अधिक अपील दावे मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे.
◾केळवा देवीचा पाडा – ६८ कुटुंबांच्या जमिनीचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय
केळवा देवीचा पाडा येथे गुरुचरण जमिनीवर ६८ कुटुंबे राहतात, मात्र त्यांची घरे असलेल्या जमिनी अद्याप त्यांच्या नावावर नाहीत. या संदर्भात प्रशासनाने स्पष्ट केले की, ग्रामपंचायतीने जागेच्या बदल्यात अधिकृत जागा दिल्यास हा प्रश्न तत्काळ सुटू शकतो. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने शासन स्तरावर पत्रव्यवहार सुरू केला आहे. लवकरच नियमानुसार या जमिनींची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
◾संजय पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रश्न सोडवण्यास गती
या प्रश्नांसाठी शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते संजय ज. पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष केला आहे. ११ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी प्रशासनाला जाब विचारत हे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.
पाटील यांनी सांगितले की, "पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि शेतकरी आपल्या हक्कांसाठी शांततेत लढत आहेत, मात्र प्रशासनाने त्यांच्या संयमाचा गैरफायदा घेऊ नये. त्यांच्या प्रलंबित कामांना गती देणे आवश्यक आहे." तसेच, वनमंत्री आणि पालकमंत्री गणेश नाईक यांच्या दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस कमारे धरणग्रस्त शेतकरी, सात गावातील वनपट्टा दावे केलेले आदिवासी बांधव आणि केळवा देवीचा पाडा येथील ६८ कुटुंबांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ता दिनेश पवार यांनी प्रशासनासमोर या तिन्ही विषयांवर सविस्तर प्रस्तावना मांडली.
प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे शेतकरी आणि आदिवासी बांधवांना आता या प्रश्नांवर लवकरच ठोस निर्णय लागेल अशी अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment