आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री गणेश नाईक

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री गणेश नाईक


पालघर, दि. २३ : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण व उत्तम भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, कळमदेवी (ता. डहाणू) येथे प्रत्यक्ष तसेच शासकीय आश्रमशाळा डोंगारी (ता. तलासरी) आणि शासकीय आश्रमशाळा एंबूर (ता. पालघर) येथील नूतन शालेय इमारतींचे उद्घाटन व विज्ञान केंद्राच्या भूमिपूजनाचा समारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला. या कार्यक्रमाला खा. हेमंत सवरा, आ. विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

१८,२२१ विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ

पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, डहाणू प्रकल्पांतर्गत ३३ शासकीय आश्रमशाळांमध्ये एकूण १८,२२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ७ शालेय इमारती, १ मुलांचे वसतीगृह आणि १३ मुलींच्या वसतीगृहांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. धरती आबा योजनेंतर्गत ७ मुलांचे वसतीगृह मंजूर असून लवकरच हे काम पूर्ण होईल.

वाढवण बंदर आणि औद्योगिक विकासाला गती

पालकमंत्री श्री. नाईक यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गरजूंना घरकूल मिळाले आहे. तसेच दुर्गम भागांमध्ये रोजगार निर्मितीसाठी विविध कंपन्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. उद्योग स्थापन करणाऱ्या कंपन्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध सवलती लागू होतील.

वाढवण बंदर जगातील १० उत्कृष्ट बंदरांपैकी एक असेल, तसेच येथे बुलेट ट्रेनचे स्टेशन, आठ पदरी महामार्ग आणि आधुनिक विमानतळ उभारले जाणार आहे. हा प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत असताना स्थानिक नागरिकांचे योग्य पुनर्वसन करण्यात येणार असून, प्रकल्पासाठी स्थानिकांनी सहकार्य केल्यास जिल्ह्याचा विकास वेगाने होईल, असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या कार्याचे कौतुक

पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिलेल्या प्रशासकीय योगदानाबद्दल त्यांचे विशेष कौतुक करत, पालकमंत्री गणेश नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक