खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र घेतल्याप्रकरणी आनंद ठाकूर आणि किरण डोंगरकर यांच्यावर गुन्हा दाखल

खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र घेतल्याप्रकरणी आनंद ठाकूर आणि किरण डोंगरकर यांच्यावर गुन्हा दाखल


डहाणू : आदिवासी वारली समाजाचा बनावट जात प्रमाणपत्र मिळवल्याच्या प्रकरणी डहाणू तालुक्यातील सरावली सावटा हात येथील आनंद रामाशंकर ठाकूर आणि किरण डोंगरकर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या पालघर जिल्हा सचिवांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

◾संयुक्त आदिवासी संघटनांचा आक्रमक विरोध


संयुक्त आदिवासी संरक्षण समिती अंतर्गत पालघर जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि राजकीय आदिवासी संघटनांनी या प्रकाराला विरोध दर्शवत तहसीलदारांसमोर आक्रमक भूमिका घेतली. यानंतर तहसीलदार डहाणू यांनी डहाणू पोलीस ठाण्यात पत्र पाठवून कारवाईची मागणी केली.


◾बनावट कागदपत्रांच्या आधारे दिशाभूल


ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिव अरुण धोडी यांनी ७ फेब्रुवारी २०२५ रोजी तहसील कार्यालयाकडे तक्रार दिली होती. चौकशीत आनंद ठाकूर हे मूळचे हिंदू-राजपूत असून, परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी शासनाची दिशाभूल करून बनावट दस्तऐवजांच्या आधारे अनुसूचित जमातीचा जात प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आले.


◾फसवणुकीचा प्रकार उघडकीस


६ मार्च २०२५ रोजी तहसील कार्यालय, डहाणू येथे सुनावणी घेण्यात आली. यादरम्यान, आनंद ठाकूर यांनी आपला जन्म २८ ऑक्टोबर १९८८ रोजी डहाणू येथे झाल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आपले आडनाव ‘ठाकरे’ असे राजपत्राद्वारे बदलल्याचे सांगितले. त्यांच्या पत्नी अनिता गणपत सापटा या वारली समाजातील असल्याने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.


◾बनावट शाळा सोडल्याचा दाखला मिळविला


आनंद ठाकूर यांनी अस्तित्वात नसलेल्या ‘शासकीय आश्रमशाळा, बापूगाव’ या नावाने शाळा सोडल्याचा बनावट दाखला मिळवला आणि त्यावर हिंदू-वारली असा जातीचा उल्लेख केला. आशागड येथील किरण डोंगरकर यांच्या मदतीने हा दाखला मिळवण्यात आला होता.


◾गुन्हा दाखल, पुढील कारवाई सुरू


या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू यांच्याकडून १३ जून २०२४ रोजी हिंदू-वारली जात प्रमाणपत्र मिळवले. मात्र, चौकशी दरम्यान ही माहिती खोटी असल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले. शासनाची दिशाभूल करून बनावट कागदपत्रे सादर केल्याचे स्पष्ट झाल्याने डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी यांनी मंडळ अधिकारी गौरव बांगारा यांच्या मार्फत डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


यानंतर आनंद ठाकूर आणि किरण डोंगरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शासनाच्या फौजदारी कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक