डहाणूतील जलजीवन मिशन प्रकरण: पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू, एक गंभीर जखमी
डहाणूतील जलजीवन मिशन प्रकरण: पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू, एक गंभीर जखमी
डहाणू– डहाणू तालुक्यातील सुखडआंबा गावातील शिरसोन पाडा जिल्हा परिषद शाळेत दुर्दैवी घटना घडली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीवर चढताना स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला, तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद शाळेजवळील सुमारे ३० फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर काही विद्यार्थी चढले होते. सायंकाळी ४:३० च्या सुमारास या टाकीच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने हे भीषण अपघात घडला.
या दुर्घटनेत हर्षला रघू पागी (११, इयत्ता सहावी) आणि शिरसन संजना प्रकाश राव (१२, इयत्ता सातवी) या दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच रीना रशू फरारा (११, इयत्ता सहावी) हिला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जल जीवन मिशन प्रकल्पाचे काम ठेकेदार हरेश बोअरवेल यांच्याकडे होते. मात्र, या बांधकामात हलगर्जीपणा झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाण्याच्या टाकीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
चळणी सुखडआंबा ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच सरिता भोई आणि ग्रामस्थांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषी ठेकेदार व संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
Comments
Post a Comment