विराज इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह तीन जणांवर जातीय अपमानप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल
विराज इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह तीन जणांवर जातीय अपमानप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल
बोईसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी विराज इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक सुखजित सिंग, शिक्षक दक्षत पाटील आणि एडमिन विवेक चव्हाण यांच्याविरोधात तारापूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल झाला असून, आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत कलम ३(१)(r), ३(१)(s) लावण्यात आले आहे.
तथापि, आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने बहुजन समाज अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी सकाळी ११ वाजता हॉटेल सरोवर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मांगणी करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सचिन लोखंडे यांनी आरोपींना निलंबित करून अटक न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. विराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुख्याध्यापक सुखजित सिंग आणि शिक्षक दक्षत पाटील यांच्यावर महिला शिक्षिकांवरील अन्याय-अत्याचाराचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पालघर कोर्टात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार विराज वर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत यासोबतच, अनिल खरात यांना न्याय मिळावा यासाठी तपास अधिकाऱ्यांची बदली करून निःपक्षपाती तपास व्हावा अशी मागणी अॅड. वैभवी घाडगे यांनी केली.
◾या शाळेत मुख्याध्यापक सुखजीत सिंग आणि दक्षत पाटील यांनी महिला शिक्षकांवर अन्याय अत्याचार केल्याच्या अनेक घटना असून मुख्याध्यापक हे विकृत आणि घाणेरड्या वृत्तीचा व्यक्ती असल्याचा आरोप करत यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, युपी, बिहार,हरियाणा राजस्थान राज्यात दलितांवर अत्याचार होत असून महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. असा काही प्रकार येथे घडला तर त्यांची धिंड काढून पालघर जिल्ह्यातून हाकलून लावू. व विराजच्या उद्योजकांनी ह्या विकृत वृत्तीच्या लोकांना तत्काळ निलंबित करून हाकलून लावण्याची मागणी सीपीएमचे हर्षल लोखंडे यांनी यावेळी केली आहे.
◾विराज इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक सुखजीत सिंग आणि सह आरोपी यांनी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना करून अपमान केल्याबद्दल यांना देशद्रोही घोषित करावे. व यांच्यावर निलंबनाची कारवाई करून विराज च्या कोणत्या संस्थेत यांना प्रवेश नाकारावा. उद्योजक कोचर यांचे मोठे नाव असून त्यांचे नाव खराब करण्याचे काम अशा या लोकांकडून करण्यात येत असून त्यावर कोचर यांनी त्वरित कारवाई करून यांना त्यांच्या राज्यात रवानगी करावी. महाराष्ट्रात अशा नराधमांना जागा नाही. पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील हे अत्यंत कर्तव्यदक्ष असून ते नक्कीच निःपक्षपाती तपास करत आंबेडकरी समाजाचे अनिल खरात यांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहोड यांनी मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी दिला आहे.
◾न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
पालघर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी जर आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील योग्य तपास करून न्याय देतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
◾बैठकीत विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित
या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे अध्यक्ष अविश राऊत, रिपाईचे प्रदेश युवक अध्यक्ष सचिन लोखंडे, सीपीएमचे हर्षल लोखंडे, वंचित बहुजन आघाडीचे फिल्म युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष निलेश गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहोड, आंबेडकर राइट्स युथ फोरमच्या अॅड. वैभवी घाडगे, प्रतीक ढाले, साहिल जगताप, आनंदराज गाडगे यांच्यासह पीडित अनिल खरात, भगवान खरात आणि विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment