पालघर जिल्ह्यात ५८ हजार महिलांचा ‘लखपती’ प्रवास!

पालघर जिल्ह्यात ५८ हजार महिलांचा ‘लखपती’ प्रवास! 

महिलांच्या कष्टाला यश; दरमहिना सरासरी ₹१०,००० कमाई



पालघर : ग्रामीण महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आर्थिक स्वावलंबनाचा नवा अध्याय लिहिला आहे. "लखपती दीदी" अभियानाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील ५८,६६२ महिला आर्थिक सक्षम झाल्या असून, त्यांची सरासरी मासिक कमाई ₹९,००० ते ₹१०,००० पर्यंत पोहोचली आहे.


राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्या आर्थिक विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत महिलांना स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील ७३,२५५ महिलांना या योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी ८०% महिलांनी ‘लखपती’ होण्याचा टप्पा पार केला आहे.


तालुकानिहाय प्रगती –

(लक्ष्य व पूर्ण केलेल्या महिलांची संख्या)

पालघर – १४,००० | १२,२११

डहाणू – १५,२५५ | ११,५४७

तलासरी – ८,००० | ६,८६२

वाडा – ८,००० | ६,५८६

विक्रमगड – ८,००० | ६,५१७

जव्हार – ८,००० | ६,०३७

मोखाडा – ८,००० | ५,६६३

वसई – ४,००० | ३,२३९


स्वयंरोजगारातून आर्थिक स्थैर्य

महिलांनी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, अन्नप्रक्रिया, हस्तकला, कुटीर उद्योग आणि शेतीपूरक व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये उद्योजकता फुलवत आहे. या उद्योगांमधून त्या दरवर्षी १ लाख रुपयांहून अधिक कमाई करू लागल्या आहेत.


पालघर जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बचत गटांना वित्तीय मदत, व्यवसाय प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जात आहे.


लखपती दीदी म्हणजे काय?

महिलांना दरवर्षी किमान ₹१ लाख उत्पन्न मिळावे, या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने "लखपती दीदी" अभियान सुरू करण्यात आले. ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न आहे.


उर्वरित महिलांसाठी प्रयत्न सुरू

अद्याप १४,५९३ महिला "लखपती" होण्याच्या मार्गावर असून, त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.


"या अभियानामुळे हजारो महिलांचे जीवन बदलले आहे. बचत गट आणि विविध योजनांच्या सहाय्याने महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारला आहे. त्यामुळे केवळ उत्पन्न वाढले नाही, तर त्यांच्या कुटुंबांचेही जीवनमान सुधारले आहे," असे पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.


महिला सक्षमीकरणाच्या या प्रवासात 'लखपती दीदी' एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक