पालघर जिल्ह्यात एसटी बस स्थानकांतील सुरक्षेचा अभाव; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पालघर जिल्ह्यात एसटी बस स्थानकांतील सुरक्षेचा अभाव; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर


बोईसर : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात महिला प्रवाशावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर प्रवासी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील एसटी बस स्थानकांची पाहणी करण्यात आली असता, सुरक्षेच्या दृष्टीने अनेक त्रुटी असल्याचे उघड झाले आहे. बेकायदा पार्किंग, रिक्षाचालकांची घुसखोरी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सुरक्षेच्या अभावामुळे प्रवासी धास्तावले


राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागांतर्गत पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, सफाळे, अर्नाळा, नालासोपारा आणि वसई या आठ एसटी आगारांचा समावेश होतो. पालघर विभागात ४४ सुरक्षारक्षक कार्यरत असले तरी बहुतांश स्थानकांमध्ये सुरक्षेची स्थिती चिंताजनक आहे. बोईसर एसटी स्थानक हे जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक असून, येथे रोज ४७५ बसफेऱ्या चालविल्या जातात. मात्र, स्थानक परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना नसल्याने महिला प्रवासी आणि विद्यार्थी धास्तावले आहेत.


बोईसर एसटी स्थानकात असुरक्षितता वाढली


बोईसर बस स्थानक तारापूर रस्त्यालगत असल्याने खासगी वाहनांची आणि रिक्षांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रिक्षा, इको आणि खासगी प्रवासी वाहने प्रवासी मिळवण्यासाठी स्थानकाच्या आतपर्यंत घुसखोरी करतात. बसस्थानकाचे काँक्रीटीकरण नुकतेच पूर्ण झाले असले तरी पश्चिम बाजूला संरक्षण भिंत नसल्याने आणि कार्यशाळेच्या मागील भिंत पावसामुळे कोसळल्याने अनेक जण बेकायदा प्रवेश करत आहेत.


गैरप्रकारांना आळा घालण्याची गरज


बस स्थानक आणि कार्यशाळेच्या दरम्यान असलेल्या निर्जन भागात रात्रीच्या वेळी मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आणि गैरप्रकार करणाऱ्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेले सुरक्षारक्षकही अनेकदा हतबल ठरत असल्याचे चित्र आहे.


पोलिस गस्त आणि सुरक्षेत सुधारणा होणार


पालघर विभागातील सर्व एसटी बस स्थानकांमध्ये सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. याबाबत बोलताना पालघर विभागाचे विभागीय नियंत्रक कैलास पाटील म्हणाले, “पुण्यातील घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आगारांची पाहणी सुरू आहे. काही त्रुटी आढळल्यास त्यात सुधारणा करण्यात येईल.”


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक