धानिवरी शाळेच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी
धानिवरी शाळेच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी
पालघर : हैदराबाद येथे झालेल्या नांदी फाऊंडेशनच्या पाचव्या "नन्ही कली तुफान गेम्स" क्रीडा स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील धानिवरी शाळेच्या विद्यार्थिनींनी अपार कष्ट आणि जिद्द दाखवून राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमठवली आहे. या विद्यार्थिनींनी दुर्गम भागात असतानाही कमी सोयीसुविधांवर मात करत आपल्या क्रीडा कौशल्याचा झंकार केला.
क्रीडा स्पर्धेत देशभरातील आठ राज्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती, त्यात महाराष्ट्रातून २० विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात धानिवरी शाळेच्या पाच विद्यार्थिनींनी यश मिळवले. विविध क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी अवघड परिस्थितीवर मात करत उत्कृष्ट कामगिरी केली.
विद्यार्थिनींच्या यशाची नोंद:
भाग्यश्री कैलास मलावकर: शटल रनमध्ये प्रथम क्रमांक, ५ मिनिटे धावणे (एंड्युरन्स) मध्ये द्वितीय क्रमांक, ५० मीटर जलद धावणे (स्प्रिंट) मध्ये तृतीय क्रमांक, उभी लांब उडी (स्टँडिंग लॉन्ग जंप) मध्ये चतुर्थ क्रमांक.
अनिता गोविंद पागी: ५ मिनिटे धावणे (एंड्युरन्स) मध्ये द्वितीय क्रमांक.
निकिता सुदेव मलावकर: ५० मीटर जलद धावणे (स्प्रिंट) मध्ये चतुर्थ क्रमांक.
ऋतिका देविदास तांबडा: ५० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक.
शिल्पा हरेश काटेला: ५ मिनिटे धावण्याच्या स्पर्धेत सेमिफायनलपर्यंत मजल.
ही सर्व विद्यार्थिनींची कुटुंबे आर्थिक दृष्ट्या अत्यंत गरीब असून, त्यांचे पालक प्रामुख्याने विटभट्टीवर काम करत आहेत. तरीही, या विद्यार्थिनींनी आपल्या कष्ट, मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय स्तरावर चमकदार यश मिळवले.
विशेष म्हणजे, या विद्यार्थिनींना "नन्ही कली" प्रकल्पांतर्गत नांदी फाऊंडेशनच्या शुभांगी धर्मा तांबड्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या अथक प्रयत्नांचा आणि मार्गदर्शनाचा मोठा प्रभाव विद्यार्थिनींच्या यशावर पडला आहे.
या यशामुळे धानिवरी शाळेचा व पालघर जिल्ह्याचा मान वाढला आहे. या विद्यार्थिनींच्या भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. त्यांच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असला की, कोणतीही अडचण यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही!
Comments
Post a Comment