पालघर जिल्ह्यात आरोग्य मित्रांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू
पालघर जिल्ह्यात आरोग्य मित्रांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू"
आरोग्य मित्रांच्या संपामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा विस्कळीत"
पालघर : पालघर जिल्ह्यात १८ फेब्रुवारी २०२५ पासून आरोग्य मित्रांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने १२ फेब्रुवारीपासून राज्यभर या आंदोलनाची सुरवात झाली होती. आरोग्य मित्रांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे.
मागील २३ ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवसीय कामबंद आंदोलन केल्यानंतर, राज्य आरोग्य हमी सोसायटी आणि सहाय्य संस्थांनी मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, नव्या सरकारच्या स्थापनेनंतर या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी आरोग्य मित्रांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे.
पालघर जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी सेवा बंद ठेवल्याने सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा विस्कळीत झाल्या आहेत. सामान्य रुग्णांना उपचारासाठी अडचणी निर्माण झाल्या असून, अनेक प्रक्रियांमध्ये विलंब होत आहे. वयोवृद्ध आणि गरजू रुग्णांना हेल्पडेस्क सुविधाही मिळत नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
आरोग्य मित्रांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
१) ₹26,000/- वेतन आणि महागाई भत्ता लागू करावा.
२) दरवर्षी १०% वेतनवाढ लागू करावी.
३) पेट्रोल भत्ता मंजूर करावा.
४) कायदेशीर रजा मिळावी.
५) बदली धोरण रद्द करावे.
६)कमी केलेल्या आरोग्य मित्रांची पुनर्नियुक्ती करावी.
७) पाच वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना उपदान मंजूर करावे.
महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले की, "हे आंदोलन आरोग्य मित्रांच्या हक्कांसाठी असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल." प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून आरोग्य मित्रांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पडलेल्या परिणामांमुळे सरकारची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकार आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य करणार का, आणि यावर तोडगा काढणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
Comments
Post a Comment