जंगलात शिकारीसाठी गेलेल्या टोळीने शिकार समजुन आपल्या साथीदारावरच झाडली गोळी
जंगलात शिकारीसाठी गेलेल्या टोळीने शिकार समजुन आपल्या साथीदारावरच झाडली गोळी
पालघर : पालघर जिल्ह्यातील मनोर तालुक्यातील आलन डोंगराच्या घनदाट जंगलात एक धक्कादायक घटना घडली आहे. मौनी अमावस्येच्या रात्री शिकारीसाठी जंगलात गेलेल्या एका टोळीने शिकार समजून आपल्याच साथीदारावर गोळी झाडली. या गोळीने ६० वर्षीय रमेश वरठा यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह जंगलातच टाकून शिकारी टोळीचे सदस्य पसार झाले.
२९ जानेवारी रोजी बोरशेती, किराट आणि रावते गावांतील १२ जण शिकारीसाठी जंगलात गेले होते. जंगलातील आंब्याच्या पाण्यावर रानडुकरे आणि पट्टेदार वाघ येत असल्याने तेथे शिकारी लपून बसले होते. रमेश वरठा हे उशिरा पोहोचले आणि आवाज न करता चालत असताना पाय पालापाचोळ्यावर पडला, त्यावरून सागर हाडळ या शिकाऱ्याने त्यांना शिकार समजून गावठी बनावटीच्या काडतुसी बंदुकीने एक फैरी झाडली. त्यातून निघालेले छरें रमेश वरठा यांना लागले आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ते पाहून आरोपी सागर हाडळ आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्यांचे प्रेत बाजूलाच झाडीत टाकून दिले आणि ते तिथून पसार झाले होते. त्यांनी सदर घटना इतर कोणालाही सांगितली नाही.
४ फेब्रुवारी रोजी रमेश वरठा यांच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. त्या अनुषंगाने चौकशी करत असताना शिकारी करीता रमेश वरठा यांच्या साथीदारांचा शोध घेवून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता सागर नरेश हाडळ, वय २८ वर्ष, रा. केळवा व त्याच्या साथीदारांनी ज्या ठिकाणी गोळी झाडली आणि जिथे रमेश वरठा यांचा मृतदेह टाकून दिला होता ती जागा दाखविली.त्यानंतर जंगलात जाऊन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली.
सदर घटनेतील आरोपी १) सागर नरेश हाडळ, वय २८ वर्ष, रा. केळवा २) सिध्दु कमलाकर भुतकडे, वय ५२ वर्ष ३) भावेश सिध्दु भुतकडे, वय २८ वर्ष, ४) एकनाथ शांताराम भुतकडे, वय ४२ वर्ष, ५) शांताराम कमलाकर भुतकडे, वय ६५ वर्ष, ६) विशाल चिंतामण घरत, वय ३१ वर्ष, ७) मद्या रघ्या वावरे, वय ४९ वर्ष, ८) वामन गोपाल पहाड, वय ६५ वर्ष, ९) दिनेश काशिनाथ वढाली, वय ४२ वर्ष, सर्व रा. बोरशेती, यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असून उर्वरित तीन इसमांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सदर घटनेबाबत पंचक्रोशी मध्ये अशी अफवा पसरली होती की सदर घटनेमध्ये दोन इसम मयत झाले आहेत त्यातील दुसरा इसमाचे नाव अंकुश मेहलोडा राहणार शिगाव असे आहे. याबाबत श्री. अभिजीत धाराशिवकर उप विभागीय पोलीस अधिकारी पालघर, पोलीस निरीक्षक श्री. रणवीर बयेस यांनी अंकुश मेहलोडा याचे घरी जाऊन खात्री केले असता त्याचे मोठे भाऊ, वडील, दोन्ही पत्नी यांनी सांगितले की सदर ईसम हा सफाळे येथे एका वाडीवर त्याची दुसरी पत्नी सह काम करीत होता आणि तिथेच राहत होता परंतु तो दीर्घ काळापासून आजारी असल्याने त्याचे मृत्यूचे तीन दिवसांपूर्वीच परत त्याचे शिगाव येथील घरी आला होता. आणि त्याच्या आजारपणात तो गुरुवार दि.३०/०१/२०२५ रोजी मयत झाला आहे. त्याचा आलन डोंगरावरील घटनेशी काहीही संबंध नाही.
पालघर परिसरात शिकारी टोळ्या गावठी कट्ट्यांचा वापर करून वन्यजीव शिकार करत आहेत. यावर वन विभागाने रात्रीची गस्त आणि गुप्त माहिती संकलनावर भर द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, लवकरच फरार आरोपींना अटक केली जाईल आणि या घटनेवर कठोर कारवाई केली जाईल.
Comments
Post a Comment