पालघर जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या
पालघर जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या
पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये अळ्या निघाल्या आणि बुरशी आलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूड वाटण्यात आले आहेत. यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या सापडल्या. याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुलांना पुरविण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडमध्ये जिवंत अळ्या आणि बुरशी आढळत आहे.
पालघर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या २ लाख ७५ हजार १९१ मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. आनंद लक्ष्मण चांदावरकर विद्यालय खानिवली आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळा- ३ येथे आलेल्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना पोषण आहार पुरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट में. इंडो अलाइड प्रोटीन फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आले आहे.
पोषण आहार निकृष्ट दर्जाचा येत असल्याच्या या आधीच शाळांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या शाळांमध्ये शिकणारी बरीच मुलं ही गरीब आणि आदिवासी बहुल भागातील आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा पोषण आहार देऊन मुलांच्या जीवाशी खेळले जात आहे. या गरीब मुलांची अशाप्रकारे थट्टा केली जात असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या संबंधित ठेकेदाराविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment