मुरबे बंदराला स्थानिकांचा विरोध असताना राज्य सरकारची मंजुरी
मुरबे बंदराला स्थानिकांचा विरोध असताना बंदराला राज्य सरकारची मंजुरी
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील जिंदाल स्टील वर्क या कंपनीकडून मुरबे बंदर उभारण्याचा प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर मंजुरी मिळाली या बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध असून कोणत्याही परिस्थितीत हे बंदर होऊ देणार नाही असा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून रखडलेल्या जिंदाल स्टील वर्क कंपनीच्या बहुउद्देशीय बंदराचा प्रश्न राज्य शासनाकडे ठेवण्यात आला होता, त्यानंतर तारापूर एमआयडीसी ते एकलारे मार्गाने मुरबे बंदरापर्यंत जाण्यासाठी रस्ता निर्मितीचे काम सुरू करण्यात आले होते, मात्र या बंदराला स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमार बांधवांचा विरोध पाहता हे बंदर काही कारणास्तव लाल फितीत अडकून पडले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या नुकताच पार पडलेल्या सभेत अखेर या बहुउद्देशीय बंदराला मान्यता देण्यात आली आहे. या बंदरामुळे तारापूर एमआयडीसीच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास कंपनी प्रशासन कडून करण्यात येत आहे.
मात्र असे असले तरी या बंदराला स्थानिकांचा कडाडून विरोध आहे . मुरबे येथे बंदर झाल्यास याचा थेट परिणाम येथील मच्छीमारांवर तसेच शेतकऱ्यांवर होणार असल्याचा आरोप स्थानिक भूमिपुत्रांकडून करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी हे बंदर उभारले जाणार आहे त्या भागात मुरबे येथील मच्छीमारांच्या बोटी तसेच कव आणि डालडा पद्धतीने केली जाणारी मच्छीमारी कायमस्वरूपी बंद होणार असल्याने येथील मच्छीमार कायम स्वरूपी देशोधडीला लागणार असल्याची भीती मच्छीमार व्यक्त करीत आहेत.
◾मुरबे बंदरापासून साधारण 20 ते 25 किलोमीटर अंतरावर वाढवण हे बंदर 76 हजार कोटी 200 रुपये खर्च करून उभारले जाणार आहे. जगातील दहा सर्वात मोठ्या बंदरांपैकी वाढवण हे एक बंदर असून यामुळे पालघरसह राज्य आणि देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. शिवाय याच समुद्र किनारी जिंदाल कंपनीच्या बहुउद्देशीय मुरबे बंदरामुळे तारापूर एमआयडीसीचा ही कायापालट होण्यास मदत लाभणार आहे.
◾जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने उच्छेळी व सातपाटी खाडीदरम्यान मुरबे समुद्र किनाऱ्यासमोरील उथळ खडकाळ क्षेत्रात भराव टाकून बंदर उभारण्याचे प्रस्तावित केले होते. सुमारे सर्व प्रकारच्या मालाची आयात, निर्यात करण्याची २५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता असणाऱ्या या प्रकल्पासाठी ४२५९ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित होता.
◾कसे असणार मुरबे बंदर
मुरबे समुद्रकिनाऱ्यापासून लंब पद्धतीने (perpendicular) समुद्रामध्ये सुमारे पाच किलोमीटर अंतरावर दोन ब्रेक वॉटर बंधारे उभारून त्यामध्ये तीन धक्के उभारण्याचे प्रस्तावित आहे. कोरडा मालवाहतूक करण्यासाठी ३२५ मीटर लांब व २४ मीटर रुंद जेटी, कंटेनर हाताळणीसाठी ४०० मीटर लांब व ४५ मीटर घाट (quay) तसेच ३०० मीटर लांब व ४५ मीटर रुंद बहुउद्देशीय घाट उभारण्यात येण्याचे प्रस्तावित आहे. या बंदराच्या उभारणीसाठी पाच वर्षांचा कालावधी लागणे अपेक्षित असून उभारणीनंतर पहिल्या वर्षी १८.६० दशलक्ष टन तर सहाव्या वर्षी नंतर २४.४३ दशलक्ष टन प्रति वर्ष माल हाताळणी होणे अपेक्षित आहे.
Comments
Post a Comment