नवापुर गावात बनणार जागतिक पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचे कृत्रिम वन
कृत्रिम वनामुळे येणार नवापूर गाव पर्यटनाच्या नकाशावर
पालघर : पालघर तालुक्यातील नवापूर गावात एचडीएफसी बँकेच्या सामाजिक दायित्व निधीमधून समुद्रकिनारी कृत्रिम वन उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे यात सात एकर क्षेत्रफळावर ९० प्रजातीचे सुमारे एक लाख आठ हजार झाडांची लागवड होणारं असून जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे समुद्रकिनाऱ्या लगत असलेले कृत्रिम वन बनणार आहे.
नवापूर गावात दांडी खाडी नाक्याजवळ गावाच्या मालकीच्या १३ पैकी सात एकर जागेवर जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे समुद्रकिनाऱ्यालगत कृत्रिम वन उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन १४ सप्टेंबर रोजी करण्यात आले यामुळे काही वर्षानंतर नवापूर गाव पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे. नवापूर गावातही किनाऱ्यालगत कृत्रिम वननिर्मिती झाल्यानंतर पर्यटकांचा ओघ वाढेल आणि नवापूर गावाची प्रगती होईल अशी अपेक्षा पर्यटक आणि पर्यावरणस्नेहींकडून व्यक्त केली आहे. येत्या काही वर्षात झाडांची घनता वाढल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वास्तव्य करणे अपेक्षित असून पर्यटकांसाठी हे कृत्रिम वन आकर्षक ठरेल असे मत नवापूरच्या सरपंच अंजली बारी तसेच फॉरेस्ट क्रिएटरचे संस्थापक आर. के नायर यांनी व्यक्त केले आहे. तारापूर औद्योगिक वसाहती मधील काही हरित पट्टांमध्ये तसेच काही कंपन्यांनी आपल्याकडे असलेल्या मोकळ्या जागेत मियावाकी कृत्रिम वनांची उभारणी यापूर्वी केली आहे. मात्र सात एकर क्षेत्रफळावर उभे राहणारे नवापूर येथील कृत्रिम वन जगातील दुसऱ्या क्रमांकाचे किनाऱ्यालगतचे कृत्रिम वन ठरेल, अशी आशा आहे.
तर दक्षिण गुजरातमधील नारगोळ या गावी जागतिक पातळीवरील समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेले सर्वात मोठे कृत्रिम वन फॉरेस्ट क्रियेटर्स संस्थेच्या आर. के नायर व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी एक लाख २० हजार झाडे लावून त्यांची पाच वर्षांपेक्षा अधिक काळ जोपासना करण्यात आली आहे. नारगोळ येथे ९३ प्रकारच्या देशी प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. येथे जपानी तंत्रज्ञानावर आधारित मियावाकी कृत्रिम वन उभे राहिले आहे. त्या ठिकाणी पाण्याच्या स्वतंत्र स्रोत्र निर्माण करण्यात आले आहेत. किनाऱ्यालगतचे हे सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे कृत्रिम वन आहे.
Comments
Post a Comment