राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पाच लाख तर जिल्हास्तरीय विजेत्यांला पंचवीस हजाराचे बक्षीस
राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पाच लाख तर जिल्हास्तरीय विजेत्यांला पंचवीस हजाराचे बक्षीस
पालघर : महाराष्ट्र शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. परिपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com / palghargeneral220@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येईल.
सदर स्पर्धा नि:शुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरीता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनीप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणुन प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.
७ सप्टेंबरपासून सुरू होणा-या गणेशोत्सवात जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पुर्ण करुन राज्यस्तरीय समितीकडे शिफारस करतील. राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ लाख , २.५ लाख आणि १ लाख रूपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांला रू.२५,०००/- रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
Comments
Post a Comment