बोईसरमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर होणार कारवाई
बोईसरमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर होणार कारवाई
बोईसर : वाहन पार्किंग ची शिस्त नसल्याने बिनधास्तपणे नागरिक कुठेही अस्ताव्यस्त पार्किंग करत असल्यामुळे सर्वांना त्याची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळेच आता रस्त्यात बेशिस्तपणे उभी केलेली वाहने उचलण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
बोईसर शहरासह सरावली, खैरा पाडा, बोईसर रेल्वे स्थानक बोईसर - चिल्हार रोड आदी विविध ठिकाणी वाट्टेल तशी बेशिस्तपणे वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून वाहनधारक रस्त्यावर कुठेही वाहन लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करतात. अशा बेशिस्त पार्कींगमुळे अनेक वेळेस वाहतूक कोंडी होवून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सोबतच अपघाती घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांना शिस्त लागावी. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक शाखेकडून बोईसर पोलीस ठाणे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पालघर चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके यांनी याची गंभीर दखल घेत वाहतूक नियमन व ठोस उपायोजना करण्याबाबत वाहतूक शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार बोईसर पोलीस स्टेशन येथे जिल्हा वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, ग्रामपंचायत, रिक्षा संघटना आणि रिक्षा चालक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे उपस्थित होते.
◾बोईसर पोलीस स्टेशन येथे आयोजित बैठकीत बोईसर रेल्वे स्टेशन परिसर, तारापूर रस्ता, नवापूर नाका, खैरापाडा, बोईसर चिल्हार रस्ता आणि एमआयडीसी परिसरातील प्रमुख रस्त्यावरील रिक्षा आणि इतर प्रवासी वाहन चालकांकडून नियम न पाळता सुरू असलेली बेशिस्त वाहतूक, रस्त्यावरील अनधिकृत रिक्षा थांबे, अवजड वाहनांचे बेकायदा वाहनतळ यामुळे होणारी वाहतूक कोंडी व अपघात याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी चिंता व्यक्त करत सर्वांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सूचना केल्या. पुढील आठवड्यात वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असून त्यानंतरही नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment