पाच वर्गांसाठी एकच शिक्षक ; पालघर जिल्हा परिषद शाळेतील २६०० शिक्षकांची पद रिक्त
पाच वर्गांसाठी एकच शिक्षक ; पालघर जिल्हा परिषद शाळेतील २६०० शिक्षकांची पद रिक्त
पालघर : पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य राम भरोसे असल्याचे उघड झाले आहे. एकट्या पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची तब्बल २६०० पेक्षाही अधिक पद रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवून घेण्यासाठी गुरूच नाही.
शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एकीकडे खाजगी इंग्लिश मिडीयम शाळांमध्ये मिळत असलेल्या सुविधा व शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील या शाळांमध्ये जात आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेली मुलांची पटसंख्या घटत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. असे असताना देखील या शाळांमध्ये शिक्षक नसल्याचे चित्र पालघर जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.
एका शिक्षकावर पाच वर्गांचा ताण
पालघर जिल्ह्यातील पहिली ते पाचवी आणि पहिली ते आठवीपर्यंत असलेल्या या वर्गांसाठी अवघे एक ते दोन शिक्षकच कार्यरत असून या शिक्षकांवर सध्या अतिरिक्त ताण पडलेला पाहायला मिळतोय. त्यातच एकाच शिक्षकाला चार ते पाच वर्ग सांभाळावे लागत असल्याने या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाबाबत ही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. पालघर जिल्हा निर्मिती होऊन दहा वर्ष उलटली. तरीही येथे शिक्षकांची कमतरता कायम असून सरकारने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाऊ लागली आहे.
Comments
Post a Comment