महायुतीचे नेते ओळखपत्राविना थेट मतमोजणी केंद्रात
महायुतीचे नेते ओळखपत्राविना थेट मतमोजणी केंद्रात
पालघर : ४ जूनला पालघर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच सकाळी साडेदहाच्या सुमारास पालकमंत्री रविंद्र चव्हाण महायुतीच्या काही नेत्यांना सोबत घेऊन, कोणतेही ओळखपत्र नसतानाही मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर गेले असताना त्यांना रोखण्याऐवजी पोलिसांनी सलामी दिली. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
पालघर येथील मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी निवडणूक आयोगाने विशिष्ट ओळखपत्रे दिली होती. मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाची तसेच ओळखपत्रांची कसून तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता. मतमोजणी केंद्राकडे येणाऱ्या मार्गावर ठेवण्यात आला होता. असे असतानाही भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनी आघाडी घेतल्यानंतर साडेदहाच्या सुमारास पालकमंत्री रविंद्र चव्हाण महायुतीच्या नेत्यांसोबत मतमोजणी केंद्रात दाखल झाले होते. मात्र, प्रत्येकाची कडक तपासणी करणाऱ्या पोलीस अधिकारी किंवा निवडणुक कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री व त्यांच्या समवेत येणाऱ्या नेते मंडळींकडे ओळखपत्राची विचारणा केली नाही. धक्कादायक बाब म्हणजे तपासणी करण्याऐवजी मतमोजणी केंद्राच्या मुख्य प्रवेश द्वारावर कार्यरत असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी पालकमंत्री यांना सलामी दिली होती.
धक्कादायक बाब म्हणजे पालकमंत्र्यांसोबत असलेल्या काही नेत्यांजवळ मोबाईलसुध्दा होता. हा प्रकार मतमोजणी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाला आहे. ही घटना लक्षात येताच शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी लगेचच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करतो, असे आश्वासन देऊन वेळ मारुन नेली होती. प्रत्यक्षात मात्र कोणतीच कारवाई केली नसल्याचेही उजेडात आला आहे. याघटनेचा दुजोरा देत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने लेखी तक्रार न केल्याने त्याची चौकशी आणि कारवाई प्रलंबित असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment