१०८ आदिवासी महिलांच्या नावे १ करोड २५ लाखाचं कर्ज काढून आरोपी महिला फरार; आदिवासी महिलांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
१०८ आदिवासी महिलांच्या नावे १ करोड २५ लाखाचं कर्ज काढून आरोपी महिला फरार; आदिवासी महिलांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
पालघर : पालघर तालुक्यातील मनोर, पाटील पाडा येथील १०८ आदिवासी महिलांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या आदिवासी महिलांच्या नावे १ करोड २५ लाखाचं कर्ज काढून आरोपी महिला सुमय्या यासर पटेल फरार झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
वाडा, पालघर, मनोर आदी ठिकाणच्या खासगी बँका तसेच पतसंस्थांकडून महिलांच्या नावावर कर्ज काढले जात होते. त्यासाठी या आदिवासी अशिक्षित महिलांची कागदपत्रे, फोटो वेगवेगळ्या बँकात सादर केले जात होते. कर्ज प्रकरणावर या महिलांच्या सह्या, अंगठे आहेत. सुमय्या ही या आदिवासी महिलांना तुमच्याकडे घरी काही काम नाही, तर महिलांचे गट बनवा, असे सांगायची. त्यासाठी ती प्रत्येक महिलेला एक हजार रुपये द्यायची आणि ज्या महिलेच्या नावावर कर्ज काढले आहे, त्या महिलेला तीन-चार हजार रुपये द्यायची. त्यातून आदिवासी महिलांना हे एक उत्पन्नाचे वेगळे साधन मिळाले असे वाटले.
सुमय्या ही या महिलांना विश्वासात घेऊन आपला गाड्या विकण्याचा व्यवसाय आहे. त्यातून मिळालेल्या पैशातून कर्जाचे हप्ते फेडीन असे सांगायची. काही महिलांच्या नावावरचे काही हप्ते तिने फेडल्याने महिलांचा विश्वास बसत गेला. काही महिलांच्या नावावरील कर्जाचा एकही हप्ता भरलेला नाही. एका एका महिलेच्या नावावर तीन-चार बँकांतून तीन-चार ते दहा प्रकारची कर्जे काढली आहेत. एका महिलेच्या नावावर इतक्या वित्तीय संस्थांनी कर्जे कशी दिली आणि त्यांचा सिबील स्कोर पाहिला नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पाटील पाडा येथील या महिलांना आता कर्ज वसुलीसाठी मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खासगी बँकांचे अधिकारी रोज घरी यायला लागले असून तसेच ज्या महिलांनी इतर महिलांचे गट करून त्यांच्या नावावर कर्ज काढण्यास सुमय्याला मदत केली, त्या महिला आता तुम्हीच कर्ज फेडा असे सांगत असल्यामुळे अशिक्षित आदिवासी महिलांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. लाखो रुपयांची फसवणूक झाली असून बँकात कागदपत्रे त्यांच्याच नावाची असल्याने कर्जफेडही त्यांनाच करावी लागणार आहे. त्यामुळे आता कर्जफेडीसाठी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न त्यांना पडला आहे.
ज्यांच्या नावावर कर्ज काढले, अशा महिलांनी सुमय्या हिच्या गावातील घरी वारंवार चौकशी केली; परंतु आता ती घरी सापडत नसल्यामुळे या महिलांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. त्या घाबरून गेल्या आहेत. अगोदर सुमय्याने धमकी देऊन महिलांचे गट तयार करायला लावले आणि नंतर कर्ज काढायला लावले. आता कर्ज भरण्याची वेळ आली, तेव्हा ती पळून गेल्यामुळे या महिलांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
Comments
Post a Comment