रुग्णालयात मर्यादेपेक्षा जास्त औषधांचा साठा ठेवल्यास डॉक्टरवर होणार कारवाई
रुग्णालयात मर्यादेपेक्षा जास्त औषधांचा साठा ठेवल्यास डॉक्टरवर होणार कारवाई
बोईसर : बोईसर केमिस्ट वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरास अन्न व औषध प्रशासन पालघर उपायुक्त महेश गाडेकर, अन्न व औषध निरीक्षक योगेंद्र पोळ उपस्थित होते. यात त्यांनी सांगितले की, मर्यादेपेक्षा जास्त औषधांचा साठा दवाखान्यात करून तो रुग्णाला विकत असणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येईल.
बोईसर आणि परिसरातील खासगी दवाखाने व रुग्णालयात तेथील प्रॅक्टिस करणारे डॉक्टर मोठ्या प्रमाणावर औषध खरेदी करून त्यांच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना ती विकत असल्याचे आढळून आले आहे. अशा डॉक्टरांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे पालघर येथील उपायुक्त महेश गाडेकर यांनी दिले. महेश गाडेकर पुढे म्हणाले की, 'औषध विक्रेता हा समाजाच्या आरोग्य रक्षणातील महत्त्वाचा घटक असून कायद्याचे काटेकोर पालन करून व्यवसाय करणाऱ्या औषधविक्रेत्यांना अनेक कारणांमुळे व्यावसायिक संघर्ष करावा लागतो. त्यातील प्रमुख म्हणजे अनेक डॉक्टर रुग्णाला मेडिकल स्टोअरमधून औषध घेण्यासाठी सांगण्याऐवजी आता स्वतःच पैसे घेऊन औषधे विकत देत आहेत. त्यामुळे ते डॉक्टर वैद्यकीय संकेतांच्या विरोधात काम करत असल्याने अशा डॉक्टरांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.'
या मार्गदर्शन शिबिरास बोईसर येथील बोईसर केमिस्ट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आयरे, चिटणीस रियाज खेराणी, खजिनदार विठोबा मराठे, उपाध्यक्ष महेश परिहार, सहचिटणीस जगदीश चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment