ठाकरे गटाकडून पालघर मध्ये भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर



पालघर : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघातून पालघर जिल्हा परिषदेवर दोन वेळा निवडून आलेल्या तसेच सव्वा वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणाऱ्या भारती कामडी यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (3 एप्रिल रोजी) भारती कामडी यांच्या नावाची घोषणा केली. 

विक्रमगड (तलवाडा) सारख्या डोंगराळ दुर्गम भागात शिवसेनेची विजयी पताका फडकवण्याचे महत्त्वपूर्ण काम भारती कामडी यांनी केले आहे. तब्बल २२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी शिवसेना पक्षवाढ आणि पक्ष बांधणीसाठी मेहनत घेतली आहे. २०१४ पासून पालघर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून त्या निवडून येत आहेत. २०१९ साली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. दीड वर्ष त्यांनी हे पद भूषवले आहे. लोकाभिमुख कामांतून जिल्हा परिषदेवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. कोविड-19 संक्रमण काळातही त्यांनी लक्षणीय कामगिरी केलेली आहे. कोरोना लस घेण्याबाबत अनेक जणांत गैरसमज होते. आदिवासी तर लस घेण्यास तयार नव्हते. या पार्श्वभूमीवर भारती कामडी यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या समाज बांधवांत लस घेण्याबाबत जनजागृती केली होती. त्यांना लस घेण्यास प्रवृत्त केले होते.


वाढवण बंदर प्रश्नावरही त्यांची ठाम भूमिका राहिली आहे. मच्छीमार, स्थानिक शेतकरी आणि अन्य नागरिकांसोबत राहण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. पालघर जिल्ह्याची स्थापन होऊन दहा वर्षे झाली आहेत. हा जिल्हा विकासात मात्र मागे आहे. तरुणांचे रोजगारासाठीचे स्थलांतर, पेसा भरती अशा विविध मुद्द्यांवर त्या सातत्याने आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आल्या आहेत. पालघर जिल्हा स्वतंत्र झाला. राज्यपालांनी आदिवासी नोकर भरती करण्यासाठी अधिसूचना काढली; पण ती कागदावर राहिली होती. या प्रश्नावर भारती कामडी यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.


तौक्ते चक्रीवादळाच्या वेेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागांत भेटी दिल्या होत्या. या वादळात मच्छीमार बोटी, वीटभट्टी, कुक्कुटपालन व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या सगळ्याचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यातूनच त्यांना ‘संघर्षकन्या` अशी ओळख प्राप्त झालेली आहे. संघर्षाच्या काळातही त्या उश शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्या आहेत. या एकनिष्ठेचे फळ म्हणूनच त्यांची लोकसभा उमेदवारी निश्चित झाली आहे. शांत-संयमी, अनुभवी, अभ्यासू आणि कार्यक्षम अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या प्रतिमा व प्रतिभेचा आणि पालघर जिल्ह्यातील लोकसंपर्काचा शिवसेनेला फायदा होईल, असा विश्वास भारती कामडी यांच्या लोकसभा उमेदवारीच्या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी