पालघर जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी, १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
पालघर : पालघरमध्ये उष्माघाताने १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अश्विनी विनोद रावते असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
एप्रिल महिना सुरू झाला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या झळांमुळे आणि उकाड्याने नागरिक दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. यातच हवामान विभागाकडूनही उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच पालघरमध्ये उष्माघातामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आली आहे. अश्विनी विनोद रावते असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
सदर घटना ही पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मधील केव वेडगे पाडा येथे घडली आहे. अश्विनीचा मृतदेह शेतात आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी ही मनोर मधील एस.पी. मराठी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती. मंगळवारी दुपारी अश्विनी अकरावीचा पेपर देऊन घरी आली होती. घरात कोणीच नसल्याने ती आई-वडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेली. दुपारच्या उन्हाचा कडाक्याने तिला चक्कर आली आणि ती शेतातच कोसळली. अश्विनीचं शेत गावापासून काही किलोमीटर अंतरावर असल्याने व दुपारच्या वेळी कोणीही घराबाहेर पडत नसल्याने तिचा मृतदेह तब्बल दोन तास तसाच पडून होता. आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना अश्विनी घरी दिसली नाही. त्यांनी सगळीकडे त्यांची शोधाशोध केली.परंतु दुपारच्या सुमारास उष्माघाताने अश्विनीचा मृत्यू झाल्यामुळे नदीजवळच्या शेतात तिचा मृतदेह पडल्याचे दिसून आले.
Comments
Post a Comment