ग्रामीण शिक्षण संस्थेचे डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेत नामांतरण; तर इंग्लिश मिडीयमच्या प्राथमिक विभागाला स्वातंत्र्यसैनिक छोटालाल श्रॉफ यांचे नामकरण
पालघर : सफाळ्याचे विकासपुरुष म्हणून मानले जाणारे डॉ. अमृते यांचे शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय योगदान लक्षात घेऊन ग्रामीण शिक्षण संस्थेने 66 व्या वर्धापन दिन सोहळ्यात डॉ.पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था असे नामांतरण करण्यात आले. हा सोहळा रविवार (दि.25) रोजी राजगुरू विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत घरत, प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राध्यापक व शिक्षणतज्ञ प्रा. विद्याधर अमृते व सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी पालघरचे अध्यक्ष सीए सचिन कोरे हे उपस्थित होते. तसेच, आरोग्य व बांधकाम समिती माजी सभापती दामोदर पाटील,देणगीदार प्रकाश श्रॉफ,भारती श्रॉफ, संस्थेच्या उपाध्यक्षा उषा पाटील, कार्याध्यक्ष खांतीलाल दोशी, सचिव ऍड. दीपक भाते, सर्व संचालक मंडळ, राजगुरू ह. म. पंडित विद्यालय व निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विलास पाटील, चंद्रप्रभा चित्तरंजन श्रॉफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुचिता पाटील, प्रवीण राऊत, सरपंच तनुजा कवळी, उपसरपंच राजेश म्हात्रे, कॅमलिनचे व्यवस्थापक अजित राणे, श्रॉफ व अमृते कुटुंबीय उपस्थित होते.
ॲड.दीपक भाते यांनी प्रास्ताविकात संस्थेची सन 1958 पासूनची वाटचाल सांगताना डॉ.अमृते व त्यांच्या कुटुंबियां विषयी ऋण व्यक्त केले. संस्थेच्या आजपर्यंतच्या जडणघडणीत डॉक्टरांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.विद्याधर अमृते यांनी मनोगतात म्हटले की, डॉक्टर व मी अनेकदा विकासात्मक बाबींवर चर्चा करायचो. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण काही करता येईल यासाठी शासन पातळीवर प्रयत्न देखील केले व त्यातूनच ग्रामीण शिक्षण संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र हे डॉक्टरांच्या प्रयत्नाने सफाळ्यात सुरु झाले. सर्व क्षेत्रात त्यांचे योगदान असल्याने त्यांना विकासपुरुष म्हटले जाते ते सार्थ आहे. सचिन कोरे यांनी संस्थेच्या नामांतरणास शुभेच्छा देऊन पंचवीस हजाराची देणगी जाहीर केली. श्रॉफ कुटुंबीयांतर्फे अक्षय श्रॉफ यांनी मनोगत व्यक्त केले तर अमृते कुटुंबीयांतर्फे रेखा अमृते-बापट यांनी मनोगत व्यक्त करून कृतज्ञतापूर्वक एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली. संस्थेला पन्नास लाख देणगी देणाऱ्या प्रकाश श्रॉफ व भारती श्रॉफ या दाम्पत्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेतील घटकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ऋणिता पाटील, भावना मीणा, संवेद पाटील, संजना भोईर (कबड्डी राज्यस्तर सर्व), सुमित मोरे (उंच उडी राज्यस्तर), विधीश राऊत (योगासन राष्ट्रीय स्तर), जयेश राऊत,कृपाली राऊत (पालक), फैयाज जमादार (प्रशिक्षक), लीलाधर रायसिंग, पंढरी गवळी, पुनम दारूवाले (कला शिक्षक) व डॉ.गीतेश पाध्ये,आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी (माजी विद्यार्थी) यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये लेझीम, नटरंग नृत्य, महाराष्ट्राची लोकधारा, नाटीका, लोकनृत्य इ. चा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुमती कुलकर्णी व जतिन कदम यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष खांतीलाल दोशी व मुख्याध्यापक विलास पाटील यांनी मानले.
Comments
Post a Comment