तारापुर औद्योगिक क्षेत्रातील पॉइनर बॉल कंपनीत करोडो रुपयांचे भंगार चोरी
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील पॉइनर बॉल कंपनीत करोडो रुपयांचे भंगार चोरी
भंगार माफिया वकील उर्फ सद्दामच्या अवैध धंद्यात स्थानिकांचा आर्थिक भांडवल ; सद्दामला अटक तर भांडवलदार कधी...?
बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहत परिसरात भंगार माफियांनी उच्छाद मांडला असून औद्योगिक वसाहती मधील बंद कंपन्यांमधील भंगार चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कौटुंबिक वादामुळे बंद पडलेल्या आणि कामगारांची देणी थकल्याने मुंबई कंपनी सममापक संस्थेच्या (प्रोव्हीजन लिक्विडेटर) ताब्यात असणाऱ्या कंपनी मधून मशीनरी आणि भंगार चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहती मधील प्लॉट क्रमांक ए-4/5 मधील पॉइनर बॉल / न्यू हॅवन स्टील बॉल कारपोरेशन प्रा. लिमिटेड कंपनीतील मशीनरी आणि भंगार साहित्य चोरण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला आहे.
कंपनीत १९८८ पासून ते २०१० पर्यंत उत्पादन प्रक्रिया सुरू होती.कंपनी मालक मिलन केसरीचंद मेहता,सुनिल धिरजलाल मेहता, मितेश धिरजलाल मेहता आणि जेहान मिलन मेहता यांच्यांतील कौटुंबिक वादामुळे उत्पादन बंद पडले होते.
बँक,व्यापारी आणि कामगारांनी थकीत रक्कम मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. कामगारांची रक्कम थकीत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने कंपनी सममापक संस्थेच्या (प्रोव्हीजन लिक्विडेटर-मुंबई)ताब्यात देण्यात आली आहे.
कंपनी सममापक संस्थेने (प्रोव्हीजन लिक्विडेटर) कंपनीतील मालमत्ता ताब्यात घेत कंपनीचे सर्वच प्रवेशद्वारे सील केले होते. कंपनी मधील मालमत्तेच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुक्युरिटी गार्ड बोर्डाचे सुरक्षा रक्षक नेमले होते. चार वर्षांपासून (२०१९) सुरक्षा रक्षक येत नसल्याने कंपनी मालकांनी जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यासोबत संगनमत करून बोईसर परिसरातील भंगार माफीया वकील बकारदी शहा उर्फ सद्दाम मार्फत भंगार चोरीला सुरुवात केली होती.
बंद कंपनी मधून भंगार चोरी सुरू असल्याची माहिती मिळताच पत्रकार सुशांत संखे, संतोष घरत, स्वप्निल पिंपळे व प्रतिक मयेकर यांनी घटनास्थळी जाऊन बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना व ११२ वर दुरध्वनी द्वारे माहिती दिल्यानंतर तासभरात घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी भंगाराने भरलेला ट्रक जप्त केला आहे.
यापूर्वी देखील कंपनीतील मशिनरी आणि अन्य भंगार साहित्याची चोरी वकील बकारदी शहा उर्फ सद्दाम यांनी केलेली असून वाडा, सातपाटी व बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. बदमाश लोकांचा काळा पैसा चोरीच्या व्यवसायात लावून वकील बकारदी शहा उर्फ सद्दाम हा गेल्या काही वर्षांपासून कंपनीतील भंगार व साहित्य चोरी करत असल्याचे बोलले जात आहे.राजकीय वरदहस्त व स्थानिकांचा संगनमताने भंगार माफीया वकील बकारदी शहा उर्फ सद्दाम यांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.बंद कंपनी मधून सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भंगार चोरी प्रकरणी भंगार माफीया वकील बकारदी शहा उर्फ सद्दाम याला बोईसर पोलिसांनी अटक केलेली असून बंद कंपनीतून भंगार चोरी करणाऱ्या वकील बकारदी शहा उर्फ सद्दाम याला या चोरीच्या व्यवसायात आर्थिक भांडवल पुरवणाऱ्या लोकांपर्यंत बोईसर पोलिसांचे जाळे पोहोचतील का ? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment