सरकारी जमीनीवर अतिक्रमण ; नवी देलवाडी ग्रामपंचायतीचे थेट सरपंच व सदस्य अपात्र...
सरकारी जमीनीवर अतिक्रमण ; नवी देलवाडी ग्रामपंचायतीचे थेट सरपंच व सदस्य अपात्र...
पालघर : पालघर तालुक्यातील नवी देलवाडी ग्रामपंचायतीचे थेट सरपंच मनिषा अर्जुन गिंभल व सदस्य मंगेश अर्जुन गिंभल यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार संबंधित कार्यालयाकडे करण्यात आली होती. या प्रकरणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी घेतलेल्या सुनावणी अंती दोषी आढळल्यानंतर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी मनिषा गिंभल यांचा थेट सरपंचपद तर मंगेश गिंभल यांचा सदस्य पद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४-ज(३) खाली अनर्ह ठरविण्यात आले आहे . सरकारी भूखंडावर अतिक्रमण असणाऱ्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मज्जाव असताना अतिक्रमणाची माहिती लपवत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. दिनांक २८/०९/२०२२ रोजी ग्रामपंचायत देलवाडी येथील तक्रारदार हेमलता रूपेश मोरे यांनी पुरावे सहित तक्रार दाखल केलेली होती.
सदर प्रकरणी मनिषा गिंभल व मंगेश गिंभल यांनी सादर केलेला खुलासा पाहता त्यांची आई ही गावातील निराधार, अशिक्षित विधवा स्त्री म्हणून व भूमिहीन असल्याकारणाने ग्रामपंचायत नवी देलवाडी यांनी सन १९९८ मधे ठराव घेऊन गावातील रिकामी असलेली जागा घरकुलाकरीता जेठिबाई अर्जुन गिंभल यांना उपलब्ध करून दिली त्या व ठिकाणी घरकुल योजनेअंतर्गत घर बांधून व घर क्रमांक २६५ ही घरपट्टी नोंद ग्रामपंचायत दप्तरी करण्यात आली असा खुलासा केला होता. परंतु सदर खुलासा सोबत ग्रामपंचायतीने सन १९९८ ठराव करून आई जेठिबाई अर्जुन गिंभल यांना जागा उपलब्ध करून दिल्या बाबतचा पुरावा सादर केलेला नाही. तसेच सदर घरकुल मंजूर असल्याबाबत पुरावा देखील सादर केलेला नाही त्यामुळे मनिषा अर्जुन गिंभल व मंगेश अर्जुन गिंभल यांची आई जेठिबाई अर्जुन गिंभल यांचा शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे हे प्रथमदर्शनी सिध्द झाले आहे.
या प्रकरणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी घेतलेल्या सुनावणी अंती सदर प्रकरणी हेमलता मोरे यांची तक्रार अर्ज अंशतः मान्य करत नवी देलवाडी ग्रामपंचायतीचे थेट सरपंच मनिषा अर्जुन गिंभल व सदस्य मंगेश अर्जुन गिंभल यांना दोषी ठरवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४-ज (३) खाली अनर्ह ठरविले आहे.
Comments
Post a Comment