सातपाटी सागरी पोलीस तर्फ उत्कृष्ट गणराया पुरस्कार.....
सातपाटी सागरी पोलीस तर्फ उत्कृष्ट गणराया पुरस्कार.....
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे कडून मंडळाला मिळणार सन्मानपत्र व सन्मान चिन्ह
पालघर - पालघर जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनात गणेशोत्सव विविध कलागुणांना वाव देणारा आणि शिस्तबद्धपणे साजरा करण्यासाठी यंदा प्रथमच गणराया पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांकडून गैरवर्तन न होता उत्सवाचे पावित्र्य राखले जावे, यासाठी मंडळांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातपाटी सागरी पोलिसांकडून ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२३’चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पोलिसांनी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना समाविष्ट करून मंडळांचे मूल्यमापन करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना केली. या समितीने सातपाटी सागरी पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन त्याचे मूल्यमापन केले होते. सातपाटी पोलिस ठाणे हद्दीतील सातपाटी, शिरगांव, आलेवाडी, नवापूर या गावांतील धर्मदाय आयुक्त विभागाकडून रजिस्टर केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना समितीने भेट देण्यात आली होती.
यावेळी मंडळाने धर्मादाय आयुक्त आणि ग्रामपंचायतीकडून आवश्यक परवाना घेतला आहे का, मंडळाने मंडप व वीज वापरासाठी परवानगी घेतली आहे का, ध्वनिक्षेपक परवाना घेतला आहे का? मंडपामुळे वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण होत नाही ना? तसेच मंडळाने आयोजित केलेला देखावा, आरास, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम याचा विषय, दर्जा व कार्यक्रमातील शिस्त, पोलिसांनी घातलेल्या अटींच्या नियमांचे पालन केले का? महिला व मुलींसाठी स्वतंत्र्य रांगेची व्यवस्था केली आहे का? तसेच प्रदूषण, स्वच्छता व पर्यावरण जागरूकता, पोलिस सहकार्य आदी बाबी तपासण्यात आली होती.
समितीकडून केलेल्या मूल्यमापनातून आज सातपाटी पोलिस ठाण्याच्या वतीने एक गाव एक गणपती सिद्धिविनायक सांस्कृतिक क्रीडा मंडळ आलेवाडी यांना प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक बाल मित्र मंडळ नवापूर व तृतीय क्रमांक CRP सातपाटी तसेच उत्तेजनार्थ उत्तर मोरे भंडारी समाज सार्वजनिक क्रीडा मंडळ शिरगावं यांना ‘उत्कृष्ट गणराया पुरस्कार’ उपविभागीय पोलिस अधिकारी निता पाडवी व सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी प्रेमनाथ ढोले यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या उपक्रमाला विविध गावांतील गणेश मंडळांनी चांगला प्रतिसाद दिल्याने मूल्यमापन समितीने समाधान व्यक्त केले.पालघर जिल्हा पोलीस दलाकडून यंदा प्रथमच ” गणराया पुरस्काराचे ” आयोजन करण्यात आले होते.पोलीस ठाणे स्तरावर शहरी आणि ग्रामीण विभागात एक ते चार क्रमांकाचे पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरस्कार प्राप्त गणेशोत्सव मंडळांमधून जिल्हा स्तरावरील पुरस्कारासाठी गणेशोत्सव मंडळांची निवड केली जाणार आहे. पुरस्कारासाठी गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी पोलीस ठाणे स्तर आणि जिल्हा स्तरावर निवड समितीच्या सदस्यांची घोषणा करण्यात आली होती.
Comments
Post a Comment