लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळणार
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळणार
पालघर : राज्यात दरवर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत "दक्षता जनजागृती सप्ताहाचे" आयोजन करण्यात येते. यावर्षी दिनांक ३०/१०/२०२३ ते दिनांक ०५/११/२०२३ या कालावधीत "दक्षता जनजागृती सप्ताहाचे” आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून फेसबुक, व्हॉटसअप, एसएमएस व इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील जनजागृती करण्यात येणार आहे.
ऑगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्हयांचे विभाजन होवून स्वतंत्र पालघर जिल्हा अस्तित्वात आला. पालघर जिल्हयांमध्ये एकुण वसई, पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा अशा ८ तालुक्यांचा समावेश आहे. भौगोलिक दृष्टया लांबचे अंतर असल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात तक्रार देणे सोईचे व्हावे या उद्देशाने पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचे कार्यक्षेत्रात प्रशासकीय इमारत - 'ब', जिल्हा मुख्यालय, पालघर – बोईसर रोड, कोळगांव, ता. जि. पालघर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे. कार्यालय सुरू झाल्यापासून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा परिणाम म्हणजेच सदरचे कार्यालय सुरू झाल्यापासून १०७ यशस्वी सापळा करण्यात येवून लाचखोर लोकसेवकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सन २०२३ मध्ये ग्रामविकास विभाग ३, वन विभाग – ३, महसुल विभाग १, पोलीस विभाग - वि. कं. - १, जिल्हा परिषद- १, खाजगी १, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग १, म.रा.वि. २- असे एकुण १३ सापळा कारवाईचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जे शासकिय नोकर शासकिय फी व्यतिरिक्त पैशाची अथवा वस्तुची मागणी करतात अशा शासकिय नोकरांविरूध्द तकार देण्यासाठी जनतेने पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे. भ्रष्टाचार निर्मुलनाचे कामात जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्याकडे भ्रष्टाचारासंबधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरूध्द तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर कार्यालयाचे मोबाईल क्रमांक ९४२३८८४७४५/९०८२६४५७११ व टोल फ्री क्रमांक १०६४ यावर संपर्क साधण्याचेआवाहन श्री.दयानंद गावडे, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment