शिक्षणामधे कुपोषण, बालमृत्यू रोखण्याचे सामर्थ्य - जि. प.अध्यक्ष प्रकाश निकम*

शिक्षणामधे कुपोषण, बालमृत्यू रोखण्याचे सामर्थ्य - जि. प.अध्यक्ष प्रकाश निकम*


पालघर : दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिना निमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील आठ आदर्श शिक्षक पुरस्काराचा वितरण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता.

शिक्षण हा सर्व गोष्टींचा पाया असून शिक्षणामुळे अनेक असाध्य गोष्टी साध्य करता येतात, पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू आणि कुपोषण या  गंभीर असलेल्या समस्यांवर देखील मात करण्याचे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे,असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले आहे. यावेळी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून जिल्ह्यात सुरू असलेला  वाचन लेखन उपक्रम महाराष्ट्रात क्रांती घडवणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुलांना तीन महिन्यात लिहिता वाचता आले नाही तर पुरस्कार किंवा शासनाचा पगार घेण्याची आपल्यात क्षमता नाही असे देखील जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी यावेळी  शिक्षकांना सुनावले. तसेच यापुढे निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एक तारखेलाच निवृत्ती वेतन देण्यात येईल आणि शिक्षकांचा पगार ही एक तारखेला करण्यात येईल  असे अध्यक्ष निकम यांनी आश्वासित केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे आठ शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.

यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन शिक्षकाच्या रूपाने चांगले गुरू भेटले म्हणून आज इथपर्यंत पोचता आले, असे सांगून आपल्या आयष्यातील शिक्षकांचे महत्व सांगून आभार व्यक्त केले.

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आपले शिक्षण पण जिल्हा परिषद शाळेतून झाले असून जिल्हा परिषद  शाळेचे अनेक शिक्षक गुरु च्या रुपात भेटले, अशा भावना यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिकून देखील प्रशासकीय सेवेत यश मिळवता आले.असे सांगून जिल्हा परिषद शाळा या गुणवत्तापूर्ण  दर्जेदार बनवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू असे सांगितले.

पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अनेक प्रेरणादायी दाखले देऊन शिक्षकांचे महत्व अधोरेखित केले.

उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी आज मी माझ्या  शिक्षकांसमोर उभा राहून त्यांना शुभेच्छा देत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे, अशा भावना व्यक्त केल्या. सभापती मनीषा निमकर यांनी मनोगतातून सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमात आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती पंकज कोरे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, समाजकल्याण समिती सभापती मनीषा निमकर, महिला व बालकल्याण सभापती रोहिणी शेलार, बांधकाम व आरोग्य सभापती संदेश ढोणे, कृषी व पशूसंवर्धन सभापती संदीप पावडे, जिल्हा परिषद सदस्य, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यावेळी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.

यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक, शेषराव बडे  यांनी प्रास्ताविक केले, तर शिक्षणाधिकारी माध्यमिक संगीता भागवत यांनी आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी