बोईसर मध्ये एनआयएची कारवाई, एका तरुणाला चौकशीसाठी घेतले ताब्यात
बोईसर मध्ये एनआयएची कारवाई, एका तरुणाला चौकशीसाठी घेतले ताब्यात
बोईसर :- पालघर जिल्ह्यातील बोईसर मधील आयएसआयएस आणि अल कायद्याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एका उच्चशिक्षित संशयिताला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने (NIA) चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हमराज शेख असे त्याचे नाव आहे. बोईसर पश्चिमेतील एका सोसायटीतून या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या या तरूणाची एनआयएकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून एनआयएकडून बोईसरमध्ये गुप्त पद्धतीने चौकशी सुरू असून आता या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. हा संशयित तरुण कुवेत, सौदी अरेबियासह केरळ या ठिकाणी मागील काही काळापासून राहत असून मागील दोन महिन्यांपूर्वीच तो बोईसरमध्ये राहण्यास आला होता. या प्रकरणात स्थानिक पोलिसांकडूनही काही माहिती हाती लागली नसली तरी मागील काही दिवसांपूर्वी बेंगळुरू आणि मुंबईत एनआयएने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईत एनआयएने संशयित तरूणाचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला असून तो घरी असताना कोणाशी बोलत होता याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्याच्या वडिलांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, एनआयएकडून संशयित तरूणाची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून माहिती मिळाल्यानंतरच या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. एनआयएने आयएसआयएस आणि अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून आज बेंगळुरू आणि मुंबई येथे धाडसत्र सुरू केले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील उच्चशिक्षीत तरुणाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान बोईसर येथून त्याला ताब्यात घेऊन बोईसर पोलिस ठाण्यात घेऊन गेले. संध्याकाळी चार वाजेपर्यंत बोईसर पोलिस ठाण्यात त्याची चौकशी सुरू होती. त्याच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला असून त्याला अधिक चौकशीसाठी मुंबई येथे नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
संशयित तरूणाचं कुटुंब गेल्या 30 वर्षांपासून बोईसर येथे राहत आहे. त्याचे माध्यमिक शिक्षण बोईसर येथे झाले आहे. त्यानंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली असून शिक्षणानंतर तो केरळ आणि सौदी अरेबिया येथे तीन वर्षे नोकरीसाठी गेला होता. मागील नोव्हेंबर महिन्यातच तो भारतात परतला होता. सध्या तो वडिलांना मदत करत होता. नोकरीनिमित केरळ आणि सौदी अरेबिया येथे गेल्यानंतरच त्याचा दहशतवादी संघटनांसोबत संपर्क झाल्याचा एनआयएला संशय असून याबाबत त्याच्या कुटुंबाला काहीच माहिती नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment