लम्पी त्वचा रोग आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी,सिद्धराम सालीमठ यांनी पशुपालकाना केले मार्गदर्शन
*लम्पी त्वचा रोग आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी,सिद्धराम सालीमठ यांनी पशुपालकाना केले मार्गदर्शन
पालघर :वाडा तालुक्यातील दिनकर पाडा,कोंढले गावातील एका पशुपालक यांच्या तबेल्यातील एका कांकरेज जातीच्या गाईमध्ये लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे रोग निदान विभाग,पुणे यांनी कळविले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरू नये,यासाठी पशुपालकानी काळजी घ्यावी.असे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी,सिद्धराम सालीमठ यांनी सांगितले आहे आणि या आजाराने जनावरे दगावण्याचे प्रमाण 1 ते 2 % असल्याने पशुपालक यांनी घाबरून जाऊ नये असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ,रवींद्र शिंदे यांनी सांगितले.
लंपी त्वचा या रोगात जनावराना खूप ताप येणे,चारा-पाणी कमी करणे,नाक व डोळ्यातून चिकट स्त्राव येणे,जनावराच्या शरीरावर गाठी येतात. पायाला सूज येवून जनावर लंगडते,दूधाळ जनावराचे दुग्ध उत्पादन कमी होते . अशी साधारण लक्षणे दिसून येतात.
बाधित जनावर इतर निरोगी जनवारांपासून वेगळे करून त्याची खबर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास देवून त्यावर उपचार करून घ्यावेत. या रोगाचा प्रसार डास,माशा,चिलटे व गोचीड-गोमाशा आदीमार्फत होत असल्याने गोठ्याची व जनावरांची स्वच्छता राखावी. गोठ्यात व जनावरांच्या बाह्य अंगावर कीटक नाशकाची फवारणी करावी .
या रोगाची लक्षणे,उपचार, प्रतिबंधात्मक उपाय व पशुपालक यांनी घ्यावयाची काळजी यावर पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद पालघरचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंजाब चव्हाण व सर्व गटातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्यामार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. रोग नियंत्रणासाठी गोट पोक्स् लसीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्याची पशुधन संख्या जवळपास 3 लाख पर्यन्त आहे, हा रोग जास्त प्रमाणात बळावल्यास जिल्हा परिषद सेस फंडातून जनावरांसाठी पुरेशी लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. बाधित गावापासून 5 किलोमीटरच्या परिसरातील येणाऱ्या सर्व गावातील तीन महिन्यावरील गाय व म्हैस वर्गातील जनावराना नजीकच्या पशुवैद्यकच्या सल्ल्याने लसीकरण करावे. वाडा तालुक्यातील खालील कोंढले,मांगाठणे,सापरोंडे,म्हसवल व उसर या 5 किलोमीटर परिसरातील गावांमध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे व जिल्हा पसुसंवर्धन अधिकारी,डॉ. पंजाब चव्हाण यांच्या संनियंत्रनाखाली व मार्गदर्शनाखाली लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. बाधित जनावराना औषधोपचार करून घ्यावे. रोग प्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी, जनावरांचे मेळावे भरवू नये,गुजरात राज्यात काही जिल्ह्यात या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने गुजरात राज्यातून गाई-म्हशी खरेदी व वाहतूक बंद करावी.असे जिल्हा पाशुसंवर्धन उपायुक्त,डॉ. प्रशांत कांबळे यांनी सांगितले. प्राण्यामधील संक्रमक आणि सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम,2009 अन्वये लंपी त्वचा रोगाच्या प्रादुर्भावांची माहिती पशुपालक,इतर कोणती व्यक्ति,शासानेतर संस्था,सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस,प्रशासनास देणे बंधनकारक असल्याचेही श्री. सालीमठ यांनी सांगितले.
Comments
Post a Comment