‘औषधांच्या अवास्तव मूल्याद्वारे जनतेची लूट’ या विषयावर ‘आरोग्य साहाय्य समिती’द्वारे विशेष संवाद
_*‘औषधांच्या अवास्तव मूल्याद्वारे जनतेची लूट’ या विषयावर ‘आरोग्य साहाय्य समिती’द्वारे विशेष संवाद !*_
*सामान्य जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी 'ट्रेड मार्जिन कॅप’ लागू करा !* - श्री. पुरुषोत्तम सोमानी यांची केंद्र सरकारकडे मागणी
औषधांचे अधिकतम मूल्य (एम्.आर्.पी.) जास्त असावे, यासाठी घाऊक औषध विक्रेते, किरकोळ औषध विक्रेते यांचा औषधनिर्मिती आणि विक्री करणार्या फार्मा कंपन्यांवर मोठा दवाब आहे. तसेच रूग्णालये, डॉक्टर्स आदींचाही या साखळीत असणारा सहभाग आणि ‘एम्.आर्.पी.’ यांवर केंद्र शासनाचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यामुळे औषधे मनमानी पद्धतीने चढ्या दरांत ग्राहकांना विकली जात आहेत. लोकसुद्धा ‘एम्.आर्.पी.’वर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे, अशा भ्रमात राहून औषधे खरेदी करत आहेत. जसे कर्करोगावरील औषधांवर 30 टक्क्यांचा ‘ट्रेड मार्जिन कॅप’ लावला आहे. म्हणजे 100 रुपयांचे औषध हे अधिकतम 130 रुपयांना विकू शकतो; मात्र अशी औषधे खूप चढ्या दरात विकली जात आहेत. सामान्य जनतेची होणारी ही लूट थांबवण्यासाठी केंद्र शासनाने सर्व प्रकारची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांवर ‘ट्रेड मार्जिन कॅप’ लागू करावा. यामुळे औषधे 80 ते 90% ने स्वस्त मिळतील, अशी मागणी तेलंगाना येथील उद्योगपती आणि ‘निजामाबाद चेंबर्स ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम सोमानी यांनी केली आहे. ते हिंदु जनजागृती समितीच्या ‘आरोग्य साहाय्य समिती’ आणि ‘सुराज्य अभियान’ यांच्या वतीने आयोजित ‘औषधांच्या अवास्तव मूल्याद्वारे जनतेची लूट’ या ‘विशेष संवादा’मध्ये बोलत होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी श्री. सोमानी यांच्याशी संवाद साधला.
लोकांना स्वस्त आणि चांगली औषधे मिळवण्यासाठी काय करावे’, याविषयी श्री. सोमानी म्हणाले, ‘बहुतांश जनतेला हे माहिती नसते की, बाजारातील अनेक औषधे ही जेनरीक आहेत. मात्र अनेक प्रसिद्ध औषधनिर्मिती आस्थापने ती औषधे स्वत:चे नाव (ब्रॅण्ड) लावून अधिक दराने विकतात. ही ब्रॅण्डेड औषधे अधिक दरात विकली जातात, ज्यामध्ये दुकानदार जेमतेम 5 ते 10% सवलत देतो. जेनरीक औषधे ब्रॅण्डेड औषधांप्रमाणेच उच्च दर्जाची असतात; मात्र लोकांचा डॉक्टरांवर अतिविश्वास असल्याने लोक डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेतात. जेनरीक औषधांवर सवलत सुद्धा अधिक प्रमाणात मिळते. आता सर्वत्र ‘प्रधानमंत्री जनऔषधी दुकाने’ आहेत. या दुकानांत ‘एम्.आर्.पी.’ स्वस्त दरात ठेऊन औषधे मिळतात. लोकांनी ही महाग ब्रॅण्डेड औषधे खरेदी करण्याऐवजी ‘प्रधानमंत्री जनऔषधी दुकानां’तून औषधे खरेदी करावीत किंवा जेनरीक औषधे खरेदी करावीत.’ ते पुढे म्हणाले की, आपल्या देशात लोकांमध्ये जागरूकता नसल्याने फार्मा कंपन्या समाजाची दिशाभूल करत आहेत. परिणामी सामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे, तसेच केंद्र शासनाचेही 5.50 लक्ष करोडचे नुकसान होत आहे. यातून काळया पैशांची निर्मिती होत आहे, याविषयी मी अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे. अधिक दरात विकल्या जाणार्या औषधांच्या लुटमारीविषयी आम्ही गेली काही वर्ष लढा देत आहोत; मात्र आता जनतेने आणि विविध संघटनांनीही जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन शासनावर दबाव टाकण्याची आवश्यकता असल्याचेही श्री. सोमानी यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment