बोईसरमध्ये फूस लावून तीन अल्पवयीन मुलामुलींचं अपहरण; अज्ञात आरोपींचा शोध सुरू

बोईसरमध्ये फूस लावून तीन अल्पवयीन मुलामुलींचं अपहरण; अज्ञात आरोपींचा शोध सुरू

बोईसर – पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात अल्पवयीन मुलामुलींच्या सलग अपहरणाच्या घटनांनी खळबळ उडवली आहे. गेल्या काही दिवसांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलगा व दोन मुली अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार संबंधित पालकांनी पोलिसांत नोंदवली आहे. सर्व प्रकरणांत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

पहिली घटना २४ मे रोजी रात्री ९.३० वाजता गणेशनगर, राणी शिगाव रोड परिसरात घडली. वासुदेव उर्फ रोहित रमाशंकर सिंग (वय १५ वर्षे ११ महिने) या अल्पवयीन मुलाचा अज्ञात इसमाने अपहरण केला. वासुदेवची उंची ४ फूट ५ इंच असून, अंगाने सडपातळ आहे. त्याने पिवळा टी-शर्ट, जिन्स पँट व काळ्या रंगाच्या चपला परिधान केल्या होत्या. या प्रकरणी गुन्हा क्र. २४५/२०२५ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुसरी घटना २७ ते २८ मेदरम्यान घडली. साईलोकनगर, बोईसर येथील फरहिन चटको खान (वय १७ वर्षे ४ महिने) हिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. तिचे वडील चटको लल्लन खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फरहिन अंगाने सडपातळ असून, ती अपहरणाच्या वेळी लाल टॉप आणि लेगीज परिधान केलेली होती. या प्रकरणी देखील गु.क्र. २४५/२०२५ नुसार अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


तिसरे प्रकरण ३१ मे रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडले. बेटेगाव जनुनीपाडा येथे राहणारी देविका रिंकु चंडालीया (वय १५ वर्षे ६ महिने) ही अल्पवयीन मुलगी अज्ञात इसमाच्या फूस लावण्यामुळे बेपत्ता झाली. तिची आई सौ. आरती रिंकु चंडालीया यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्र. २५०/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२) आणि भादंवि कलम ३६३ अंतर्गत कारवाई सुरू आहे.


या तिन्ही प्रकरणांतील आरोपी अद्याप अज्ञात असून, बोईसर पोलीस तपासात गुंतले आहेत. नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, अल्पवयीनांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू