बोईसर एमआयडीसीत एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
बोईसर एमआयडीसीत एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
बोईसर : पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी परिसरात फार्मास्युटिकल लॅबच्या आड लपवलेली मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज तयार करणारी गुप्त फॅक्टरी मुंबई एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या धडक कारवाईत ५० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल, त्यात एमडी ड्रग्ज, वाहनं, मोबाईल फोन्स आणि बनवणीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी फरहान गुलजार खान (३६), प्रतीक सुदर्शन जाधव (२४) आणि विजय राजाराम खटके (४३) यांना अटक करण्यात आली आहे.
संशयास्पद कारमुळे कारवाईची सुरुवात
७ जूनच्या रात्री ११.४५ वाजता एमआयडीसी पोलिसांनी पंप हाऊस सबवेमार्गे कनॉसा जंक्शनकडे जाणारी स्कोडा कार संशयित वाटल्याने थांबवली. तपासणीदरम्यान वाहनचालक फरहान खानकडून ७१ ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत २.८० लाख रुपये) जप्त करण्यात आले. चौकशीत त्याच्या विरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १३ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
फरहानकडून मिळालेल्या माहितीतून पोलिसांनी प्रतीक जाधवला अटक केली. त्याच्याकडून २१५ ग्रॅम एमडी (किंमत ८.६० लाख रुपये) हस्तगत करण्यात आले. यानंतर मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी बोईसर एमआयडीसीतील प्रोकेम फार्मास्युटिकल्स लॅब (प्लॉट नं. J-114) येथे छापा टाकला. तेथून ११.२० लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज, कच्चा माल आणि उपकरणे तसेच दोन दुचाकी आणि सहा मोबाईल फोन्स असा एकूण ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
विजय खटके हा उच्चशिक्षित रसायनशास्त्रज्ञ असून, एमडी तयार करण्याच्या प्रक्रियेत तो तांत्रिक भूमिका बजावत होता. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, खटके हे ड्रग्ज विक्रीसाठी तयार करत होता.
तिघाही आरोपींना अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस आता या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेत तपासाची व्याप्ती वाढवत आहे.
Comments
Post a Comment