पालघर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईचे आदेश — जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांचा इशारा
पालघर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईचे आदेश — जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांचा इशारा
पालघर : पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या बोगस वैद्यकीय व्यवसायांना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर आणि तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. जिल्हास्तरीय बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः जिल्हाधिकारी डॉ. जाखड होत्या.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, सर्व तालुक्यांचे आरोग्य अधिकारी तसेच पोलिस विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी स्पष्टपणे सांगितले की, “समित्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय अर्हतांची सखोल तपासणी करावी. ही तपासणी पूर्ण केल्यानंतर पुढे नवीन उघडणाऱ्या दवाखान्यांविषयी समित्यांना माहिती मिळवणे आणि त्यांची वैधता पडताळणे अधिक सुलभ होईल.”
तसेच, तपासणी दरम्यान कोणी अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
◾सोशल मीडियावरून मिळालेल्या तक्रारींची त्वरित दखल घ्या
डॉ. जाखड यांनी यावेळी विशेषतः समाजमाध्यमांवरून किंवा जनतेकडून येणाऱ्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याचे निर्देश दिले. “कोणतीही तक्रार प्राप्त होताच त्वरित पथक पाठवून पडताळणी करावी. बोगस डॉक्टर आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा. कोणत्याही परिस्थितीत अशा फसव्या लोकांना सहन केले जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही कारवाई जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरणार असून, प्रशासनाची गंभीर दखल या मुद्द्यावर असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.
Comments
Post a Comment