बोईसरमध्ये महिलेस मारहाण; दोन भावांविरोधात गुन्हा दाखल
बोईसरमध्ये महिलेस मारहाण; दोन भावांविरोधात गुन्हा दाखल
बोईसर — बोईसरमधील यादवनगर परिसरात एका महिलेवर झालेल्या कथित हल्ल्याने परिसरात खळबळ उडवली आहे. एका ३० वर्षीय गृहिणीने दोन भावांविरुद्ध शिवीगाळ, विनयभंग व मारहाणीबाबत बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या ११ वर्षांच्या मुलीला सकाळी ८ ते ८.३० वाजेदरम्यान घराच्या मागील बाजूस असलेल्या कडुलिंबाच्या झाडावरून पाला आणायला सांगितले होते. मुलगी पाला तोडण्यासाठी ड्रिमसिटी बिल्डिंगच्या कंपाऊंडवर चढली असता, तेथे राहणारे शहा आलम चौधरी व त्याचा भाऊ जफर आलम चौधरी यांनी तिला अडवून “हे झाड तुझ्या बापाचं आहे का?” अशा शब्दांत दमदाटी केली.
महिलेने हस्तक्षेप करत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनी तिला शिवीगाळ करत धमकावले. या दरम्यान, जफर आलमने महिलेच्या छातीला हात लावून तिची मॅक्सी पकडून झटापट केली, ज्यामुळे तिचा विनयभंग झाल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर दोघांनी मिळून तिच्यावर ठोसे व बुक्क्यांनी हल्ला केला. यानंतर शहा आलमने लाकडी दांडक्याने तिच्या उजव्या खांद्यावर, डाव्या हातावर, मांडीवर व कमरेवर मारहाण केल्याची माहिती आहे.
जखमी अवस्थेत महिला आपल्या पती व आईसोबत उपचारासाठी बोईसरच्या सरकारी रुग्णालयात गेली आणि नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 74 (दंगल घडवणे), 118(1) (धमकी देणे), 115 (विनयभंग), 352 (मारहाणी), 351(2) (शारीरिक छळ), व 3(5) (शारीरिक आक्रमण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भगवंत चौधरी करत आहेत.
Comments
Post a Comment