केळवेतील रिसॉर्टमध्ये गोळी लागून १७ वर्षीय तरुणी गंभीर जखमी
केळवेतील रिसॉर्टमध्ये गोळी लागून १७ वर्षीय तरुणी गंभीर जखमी
पालघर : पालघर जिल्ह्यातील केळवे येथील एका खाजगी रिसॉर्टमध्ये फिरायला गेलेल्या १७ वर्षीय तरुणीवर गावठी कट्ट्यातून चुकून गोळी झाडली गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (३० मे) दुपारी घडली. या गोळीबारात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या बेटेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी तरुणीचे नाव तेजल भिडे असून ती बोईसरजवळील लोखंडीपाडा येथील रहिवासी आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तेजल भिडे ही तिचा प्रियकर दिनेश धोडी (रा. लोखंडीपाडा) याच्यासोबत केळवे येथील रिसॉर्टमध्ये थांबली होती. रूममध्ये पोहोचल्यानंतर दिनेश वॉशरूममध्ये गेला असताना तेजलने त्याची बॅग तपासली. त्या बॅगेत तिला गावठी कट्टा आढळला. कुतूहलातून तिने कट्टा बाहेर काढून पाहणी करत असताना चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी झाडली गेली. ही गोळी तिच्या मानेला लागून आतमध्ये अडकली.
घटनेनंतर घाबरलेल्या दिनेशने तत्काळ रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि जखमी तेजलला पालघरमधील माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी बोईसरमधील बेटेगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिच्या मानेतील गोळी काढण्याचे शस्त्रक्रियेसारखे प्रयत्न सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच पालघर जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तसेच रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पीडित तरुणीच्या नातेवाईकांशी संवाद साधत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. दरम्यान, रुग्णालयाबाहेर ग्रामस्थांची व नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती.
या घटनेमागे नेमका हेतू काय होता, गोळी अपघाताने झाडली की हेतुपुरस्सर, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. याशिवाय, दिनेश धोडी याच्याकडे आढळून आलेला गावठी कट्टा अधिकृत होता की बेकायदेशीर, याबाबतही चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, दिनेश धोडीविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घटनेने केळवेतील पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ही घटना केळवेतील रिसॉर्टमध्ये घडल्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक पर्यटनस्थळी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अल्पवधीत दोन गंभीर घटना घडल्यामुळे रिसॉर्ट चालकांकडून ओळखपत्रांची आणि कागदपत्रांची योग्य पडताळणी केली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Comments
Post a Comment