तारापूर औद्योगिक क्षेत्रात घातक रसायनाची बेकायदेशीर वाहतूक; मुख्य केमिकल माफियांवर गुन्हा दाखल

तारापूर औद्योगिक क्षेत्रात घातक रसायनाची बेकायदेशीर वाहतूक; मुख्य केमिकल माफियांवर गुन्हा दाखल

बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीतून घातक रसायनाची संशयास्पद वाहतूक करणारा टँकर पोलिसांनी खैरापाडा तपासणी नाक्यावर ६ मे रोजी ताब्यात घेतला. या प्रकरणाचा तपास पुढे नेल्यावर, रसायनाचा साठा अत्यंत घातक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले असून, संबंधित टँकर व केमिकल माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या टँकरचा क्रमांक एम.एच.०४ डी.एस.९६२८ असून, तो अष्टविनायक एंटरप्रायझेस या कंपनीचा आहे. टँकर मधील रसायनासंबंधी कोणतीही कागदपत्रे चालकाकडे आढळली नव्हती. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यांनी रसायनाचे नमुने ताब्यात घेऊन ठाणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.


२६ मे रोजी प्राप्त झालेल्या प्रयोगशाळा अहवालानुसार, नमुन्याचा सीओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) १२३२०० मिग्रॅ/लिटर इतका असून, तो अत्यंत घातक स्वरूपाचा आहे. तसेच, अष्टविनायक एंटरप्रायझेसने घातक रसायन वाहतुकीपूर्वी आवश्यक असलेला 'मॅनीफेस्ट (फॉर्म १०)' ऑनलाईन सादर केलेला नव्हता, जे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन आहे.


या प्रकरणात मुख्य नील राऊळ, विवेक वडे आणि शुभम दुबे या केमिकल माफियांविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टँकरमधून वाहतूक करण्यात आलेल्या घातक रसायनाचा स्रोत शोधण्यासाठी, ज्या कंपनीतून रसायन भरले गेले त्या कंपनी विरोधातही चौकशी व कारवाईसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.


औद्योगिक क्षेत्रातील वाढती रसायन वाहतुकीची अनियमितता आणि पर्यावरणासाठी निर्माण होणारा धोका लक्षात घेता, या प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे.



Comments

Popular posts from this blog

आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण

बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

डहाणूतील भीम बांधावर दुर्दैवी घटना – पर्यटक महिलेचा बुडून मृत्यू; १८ तासांनंतर मृतदेह सापडला