सिडको बायपास रस्त्याला ४० लाखांचा निधी मंजूर, अतिक्रमणामुळे काम बंद, लोकांचे लक्ष ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर
सिडको बायपास रस्त्याला ४० लाखांचा निधी मंजूर, अतिक्रमणामुळे काम बंद, लोकांचे लक्ष ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर
पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत असताना या विरोधात शिवसेनेचे शहरप्रमुख अतुल देसाई यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.
बोईसरमधील सिडको बाह्यवळण मार्गासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या बाह्यवळण मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम कंत्राटदारांकडून सुरू करण्यात आले असून या मार्गातील अतिक्रमणाने मात्र या कामाला ब्रेक लावला आहे. सिडको बाह्यवळण मार्ग हा भविष्यात तारापूर मुख्य रस्त्याला जोडणारा पर्यायी रस्ता असून वाहतुकीसाठी कमी अंतराचा व सोयीचा असल्याने दररोज हजारो वाहने, औद्योगिक परिसरात ये-जा करणारे कामगार व स्थानिक नागरिक या रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात.
तारापूर मार्गावरून नवापूर रस्ता व बोईसर-चिल्लार मार्गे जाण्यासाठी सिडको बायपास रस्ता हा वळणाचा पर्यायी मार्ग आहे. या रस्त्यामुळे बस स्थानकासमोर तारापूर रस्त्यावर नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
एकूण ५०० मीटर अंतराच्या या बाह्यवळण मार्गाचे ४०० मीटर अंतराचे दोन टप्प्यांत काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र उर्वरित १०० मीटर अंतराचा भाग आवश्यक निधी अभावी गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला होता.
पावसाळ्यात चिखलामुळे रस्ता निसरडा होत असल्यामुळे दुचाकी चालकांचे अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत. अपूर्ण स्थितीत असलेल्या या रस्त्याला निधी मंजूर झालेला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गाचे काम कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेतले जात असतानाच या मार्गाच्या मधोमध काही समाजकंटकांनी सिडकोच्या अभियंतांशी हातमिळवणी करत वृक्ष लागवड करून मार्गच बंद केल्यामुळे काम सुरू होण्यापूर्वीच या मार्गाच्या कामाला ब्रेक लावण्यात आलेला आहे. येणाऱ्या पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे दुचाकीधारकांसाठी मोठ्या अडचणीचे ठरणार आहे.
दरम्यान, बोईसर नागरिकांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे बोईसर-तारापूर मार्गावरून सिडको बाह्यवळणाच्या काँक्रिटीकरणासाठी करोडो रुपये खर्च करताना सिडकोच्या अभियंत्यांनी कुठल्याही प्रकारची हरकत घेतलेली नसून सरावलीकडे जोडणाऱ्या उर्वरित १०० मीटर मार्गाच्या काँक्रिटीकरणात मात्र सिडकोच्या अभियंत्यांनी अतिक्रमणधारकांच्या सांगण्यावरून कामाला अडथळा निर्माण केल्यामुळे बोईसर ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment