डफोन लॅबोरेटरीजमधील कामगारांचे आरोग्य धोक्यात : अस्वच्छ व धोकादायक ठिकाणी जेवणाची सक्ती

डफोन लॅबोरेटरीजमधील कामगारांचे आरोग्य धोक्यात : अस्वच्छ व धोकादायक ठिकाणी जेवणाची सक्ती

बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर E-61/2 येथे स्थित डफोन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा अत्यंत गंभीर प्रश्न समोर आला आहे. सदर कंपनीत काम करणारे मजूर भट्टीच्या बाजूला व रासायनिक नाल्याजवळ असलेल्या जागेतच बसून जेवण करत असल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले आहे.

या ठिकाणी कामगारांना जेवण करताना भट्टीतून उडणाऱ्या कोळशाचे कण व केमिकलयुक्त नाल्यांमधून येणारा दुर्गंधीमय वास यांचा सामना करावा लागत आहे. इतकेच नव्हे, तर या उष्णतेच्या झळा असलेल्या परिसरात उघड्यावर बसून अन्नसेवन करणे ही त्यांच्या आरोग्याला गंभीर धोकादायक बाब आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतकी गंभीर परिस्थिती असूनही कंपनीकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते.


कामगारांसाठी सुरक्षित व स्वच्छ जेवणाची कोणतीही सोय नसल्यामुळे त्यांना आरोग्याच्या जोखमीकडे दुर्लक्ष करत उदरनिर्वाहासाठी काम करावे लागत आहे. कामगारांच्या हक्कांचे आणि सुरक्षिततेचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या या प्रकाराची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे.


संबंधित औद्योगिक सुरक्षा विभाग तसेच स्थानिक प्रशासनाने त्वरित कारवाई करून कामगारांसाठी सुरक्षित व स्वच्छ जेवणाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. अन्यथा भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण ठरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Comments